कोणी लस देता का लस...? खासगीत बंद तर सरकारी रुग्णालयांमध्येही दुष्काळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:06+5:302021-07-23T04:21:06+5:30
सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. आठवड्याला केवळ सरासरी २० ते २५ हजार डोस येतात. त्यामुळे ...
सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. आठवड्याला केवळ सरासरी २० ते २५ हजार डोस येतात. त्यामुळे नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासन स्तरावरूनच कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच लस कमी असल्याने खासगीत बंद असून शासकीय रुग्णालयांमध्ये लसीचा दुष्काळ असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला लसीचा पुरवठा मुबलक झाला; परंतु गैरसमज व भीतीपोटी लोक समाेर येत नव्हते. आता विश्वास बसल्याने लोक पुढे येत आहेत; परंतु लस कमी असल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र लसीकरण केंद्रांवर पहावयास मिळते.
कोव्हिशिल्डलाच सार्वाधिक पसंती
जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या कोरोना लसमध्ये काेव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन लसींचा समावेश आहे. असे असले कोव्हॅक्सिन लसीचा खूपच कमी पुरवठा होतो. त्यामुळे लोक कोव्हिशिल्ड लस घेण्यालाच पसंती देत आहेत.
आरोग्य विभागाची यंत्रणा लस देण्यासाठी पुरेशी आहे. आलेले डोस एकाच दिवसात देण्याची तयारी आरोग्य विभागाची आहे. परंतु शासनस्तरावरून कमी लस येत असल्याने आरोग्य विभागाची अडचण होत असल्याचे दिसते.
पहिला डोस घेणारे लोक
५११४०६
दुसरा डोस घेणारे
१४९४६४
आम्हालाही लसीकरणाची परवानगी द्यावी, यासाठी खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला पत्र देण्यासह रक्कमही भरली आहे.
परंतु, शासकीय रुग्णालयांमध्येच लसीचा अपुरा पुरवठा होत असल्याने खासगी रुग्णालयांची परवानगी सध्या नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मागणी करतच आहोत
जिल्ह्यात आठवड्यात दोन वेळा लस येते. साधारण २० ते २५ हजार डोस येतात. हे प्रत्येक केंद्रावर वितरित केले जातात. खासगी रुग्णालयांचीही मागणी असली तरी लस नसल्याने दिलेली नाही.
- डॉ. रौफ शेख, नोडल ऑफिसर.