४३६ गुन्ह्यांची उकल करणारा श्वान ‘डॉन’ कालवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:29 AM2021-02-08T04:29:49+5:302021-02-08T04:29:49+5:30
= फोटो बीड : जिल्हा पोलीस दलाचे नाव देशभरात उंचवणाऱ्या श्वान ‘डॉन’चे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याने आपल्या ...
= फोटो
बीड : जिल्हा पोलीस दलाचे नाव देशभरात उंचवणाऱ्या श्वान ‘डॉन’चे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याने आपल्या दशकभराच्या सेवेत तब्बल ४३६ गुन्ह्यांची उकल करण्यात मदत केली होती, तसेच आपल्या गुणवत्तेवर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून देत, बीड पोलीस दलाची मान त्याने उंचावली होती. डॉन हा पथकातील पहिला गुन्हेशोधक श्वान होता.
जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकाची स्थापना सन २०१० मध्ये झाली. अडीच महिन्यांचा डॉन हा श्वान पथकातील पहिला गुन्हे शोधक श्वान होता. जर्मन शेफर्ड जातीचा डॉन हट्टी स्वभावाचा मात्र, आपल्या कामात निष्णात होता. जमिनीवरून वास घेत, तो अचूूकतेने चोरट्यांचा माग काढत असे. जिल्हा पोलीस दलात दहा वर्षे सेवा करताना डॉनने तब्बल ४३६ गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चोरट्यांचा माग दाखविण्याचे काम केले. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात देशस्तरावर डॉनची डॉनगिरी त्याच्या काळात कायम होती. भोपाळ येथे झालेल्या मेळाव्यात डॉनने कांस्य पदक पटकावत राज्याचे नाव उंचावले होते, तर हरियाणा, चेन्नईच्या मेळाव्यांमध्येही टॉप फाइव्हमध्ये स्थान पटकावले होते. राज्यस्तरावर झालेल्या मेळाव्यात ०३ सुवर्ण पदक, तर परीक्षेत्रीय मेळाव्यातही ३ सुवर्ण पदके त्याने पटकावली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनीही डॉनच्या कामाचे कौैतुक करत त्याचा विशेष सत्कार केला होता, तर तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनीही मुंबईत बोलावून घेत, डॉनचे कौतुक केले होते.
मागील काही महिन्यांपासून तो वयोमानाप्रमाणे आजारी पडत असल्याने, नोव्हेंबर, २०२० मध्ये त्याला निवृत्ती दिली गेली होती. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याच्यावर कल्याण भवन परिसरात अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला सलामी दिली. त्याला दहा वर्षांपासून सांभाळणारे हस्तक संजय खाडे यांना माहिती देताना अश्रू अनावर झाले होते.
आरोपींच्या दारापर्यंत माग
तीन गुन्ह्यांमध्ये डॉनने थेट आपल्या अचूकतेने आरोपींच्या घरापर्यंत माग काढला. पिंपळनेर येथील खून प्रकरण, परळीतील खून प्रकरण अंबाजोगाईत योगेश्वरीच्या दागीने चोरी प्रकरणातही थेट चांदीची कमान सापडून देण्यापर्यंत डॉनने माग दाखविला होता.