रक्तदानासाठी दात्यांनो, पुढे या !; बीड जिल्हा रुग्णालयाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:08 PM2018-05-04T14:08:45+5:302018-05-04T14:08:45+5:30
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णलयाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड : जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रक्तदानासाठी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांनी पुढाकार घेत रक्त संकलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णलयाच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तसंकलनात बीड जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी राज्यात प्रथम क्रमाकांवर आहे. हे सर्व यश जिल्ह्यातील रक्तदात्यांमुळेच शक्य झाले असे गौरवोद्गार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी काढले होते. यामुळे रक्तपेढीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह आणखीनच वाढला. संघटना, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालय, संस्था यांना भेटी देण्याबरोबरच त्यांच्याशी चर्चा करुन रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेकडो दात्यांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळेच आज जिल्हा रुग्णालयाची मान रक्तसंकलनामुळे उंचावली आहे.
आता पुन्हा एकदा सर्वांनी पुढे येऊन जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत जास्तीत जास्त रक्त संकलन करण्यासाठी रक्तदान करण्याची गरज आहे. तसे आवाहनही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी ठेवून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो असे म्हणत रक्तदान करण्याची गरज आहे.
दात्यांनी पुढे यावे
रुग्णांचे हाल होणार नाहीत, त्यांना अडचण येणार नाही यासाठी आम्ही तत्पर असतो. रक्तसंकलनात जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी अव्वल आहे. दाते आणि रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे यश आहे. आतापर्यंत दात्यांच्या पुढाकारामुळेच रक्तपेढीने यशाचे उंच शिखर गाठले आहे. आता पुन्हा एकदा दात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड