‘डीएसबी’चा संवाद बिघडला; बीड पोलिसांना निवडणूक काळात येणार अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:12 PM2019-03-04T14:12:00+5:302019-03-04T14:16:16+5:30
डीएसबीत कोणाचा कोणावर वचक नसल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
बीड : पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विषेश शाखेतील (डीएसबी) कर्मचाऱ्यांचा संवाद ‘बिघडला’ आहे. सर्वसामान्यांचा विश्वास जिंकुन माहिती जमा करून ती गोपनिय ठेवणे त्यांच्यासाठी कठीन राहणार आहे. काही कर्मचाऱ्यांच्या ‘अति शहाणपणा’मुळे येणाऱ्या निवडणूक काळात बीडपोलिसांना आता ‘विशेष’ अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. डीएसबीत कोणाचा कोणावर वचक नसल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
जिल्हा विशेष शाखा मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरू पहात आहे. माध्यमांना व्यवस्थित माहिती न देणे, व्हिआयपी बंदोबस्तात त्रुटी ठेवणे, आंदोलनांची माहिती न ठेवणे, ठाणे प्रमुख आणि ठाण्यांतील विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांशी उद्धट बोलणे, असे प्रकार वाढले आहेत. येथील कर्मचारी कामचुकारपणा करून केवळ ‘मोबाईल’मध्येच गुंतलेले दिसतात. येथील अधिकारीही त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याने त्यांना कोणाचीच भिती नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहेत.
दरम्यान, बीडमधील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्ताची माहिती आणि स्कीमही जिल्हा विशेष शाखेला रात्री उशिरापर्यंत माहिती नव्हती. पोलीस उपअधीक्षक कार्यालय आणि बीड शहर ठाण्याला विचारा, असे सांगून डीएसबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात झटकले होते. यावरून जिल्हा विशेष शाखा किती तत्पर आहे, याचा प्रत्यय सर्वांना आला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी यापुढे असे होणार नाही, असे सांगितले होते. याबाबत जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत मानकर म्हणाले, सुसंवाद ठेवायला पाहिजे. ही कॉमन बाब आहे, यासाठी प्रशिक्षणाची गरज नाही.
निवडणूक काळात अडचणी वाढणार
डीएसबीने नागरिकांशी संवाद ठेवून गोपनिय माहिती घेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा विशेष शाखा याला अपवाद आहे. येथील कर्मचाऱ्यांचा संवाद ‘अति शहाणा’ असल्याने त्यांना गोपनिय माहिती मिळणे अशक्य आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे बीड पोलिसांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.