माजलगाव (बीड ) : माजलगाव धरणामुळे विस्थापित झालेल्यांना धरणग्रस्तांचे शासनाने शहराच्या जवळपास ११ गावात पुनर्वसन केले. या गावांणा माजलगाव नगरपालिकेचा पाणी पुरवठा आहे. पाणी पुरवठ्याची थकबाकी या गावांकडे आहे. याच्या वसुलीसाठी पालिकेने आज या गावांचा पाणी पुरवठा खंडित केला. यामुळे येथील ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
माजलगाव धरणाच्या निर्मितीसाठी तालुक्यातील २२ गावांतील ग्रामस्थांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांच्या त्यागामुळे माजलगाव धरण उभारले. यामुळे आज तीन जिल्ह्यातील ८५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. तसेच यामुळे बीड, माजलगाव शहरासह ११ पुनर्वसित गावच्या नागरिकांची तहान भागते.
माजलगाव शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या ११ पुनर्वसित गावांसाठी वीस वर्षापूर्वी संयुक्त पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्रासह सुरु झाली. तेव्हांपासून या गावांना नगरपालिका पाणीपुरवठा करते. यासाठीचा कर मागील काही वर्षांपासून या गावांकडे थकीत आहे. मागील १५ वर्षांपासून याबाबत काही कारवाई झाली नाही. मात्र, याबाबत नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी अचानक निर्णय घेत थकबाकी वसुलीसाठी या गावांचा पाणी पुरवठा खंडीत केला. यामुळे भर उन्हाळ्यात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही यामुळे ज्या धरणासाठी सर्वस्व दिले तेथील पाण्यासाठीच या ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत आहे.
पालिकेने किती सहन करायचे पालिकेला महिन्याकाठी लाखो रुपयाचे वीजबिल भरावे लागते. पालिकेने एकट्यानेच हा भुर्दंड का सहन करायचा ? यापुढे पैसे भरल्याशिवाय पाणी सुरु करणार नाहीत.- सहाल चाऊस, नगराध्यक्ष.