नाफेडच्या ढिसाळ नियोजनामुळे बीडमध्ये तूर खरेदीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:33 AM2018-05-09T00:33:32+5:302018-05-09T00:33:32+5:30
नाफेडच्या वतीने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली असलीतरी केवळ बारदानाअभावी मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच केंद्रांवर तूर खरेदी ठप्प आहे. त्यामुळे आता सहा दिवसांत १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान स्थानिक यंत्रणेपुढे आहे. नाफेडच्या ढिसाळ नियोजनामुळे केंद्रांवर मुबलक तूर शेतकरी आणत असतानाही खरेदी होत नसल्याची स्थिती आहे. आता बारदाना आल्यानंतर तूर खरेदी पुन्हा सुरु होणार आहे. किमान तीन दिवस शेतक-यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाफेडच्या वतीने तूर खरेदीसाठी मुदतवाढ दिली असलीतरी केवळ बारदानाअभावी मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच केंद्रांवर तूर खरेदी ठप्प आहे. त्यामुळे आता सहा दिवसांत १३ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान स्थानिक यंत्रणेपुढे आहे. नाफेडच्या ढिसाळ नियोजनामुळे केंद्रांवर मुबलक तूर शेतकरी आणत असतानाही खरेदी होत नसल्याची स्थिती आहे. आता बारदाना आल्यानंतर तूर खरेदी पुन्हा सुरु होणार आहे. किमान तीन दिवस शेतक-यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हमीदराने तूर खरेदीसाठी शासनाने नाफेडचे १५ केंद्र जिल्ह्यात सुरु केले. १ फेब्रुवारीपासून खरेदी सुरु झाली. १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदीचे आदेश होते. पुरेसा बारदाना आणि गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदीत अनेकदा अडथळे आले. नोंदणी केलेल्या शेतक-यांची पूर्ण तूर खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली.
याबाबत निर्णय घेण्यात ५ दिवस वाया गेले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाली. प्रत्यक्षात २५ एप्रिलपासून तूर खरेदी पुन्हा सुरु झाली. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे मात्र नाफेडच्या केंद्रांवर खरेदी केलेली तूर भरण्यासाठी बारदान्याचा तुटवडा सुरु झाला. परिणामी तूर खरेदी बंद ठेवण्याची वेळ आली. १३ हजार १०० शेतक-यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. त्यामुळे खरेदीचा वेग वाढवावा लागणार आहे.
दोन आठवड्यांपासून स्थानिक यंत्रणेकडून बारदाना मागणी व पाठपुरावा होऊनही अद्याप पुरवठा झालेला नाही. यामुळे तूर खरेदी थांबली असल्याने शेतकरी मात्र वैतागले आहेत.
सात केंद्रांवर बारदानाच नाही
सध्या जिल्ह्यातील बीड, गेवराई, परळी, वडवणी, शिरुर, आष्टी आणि कडा येथील खरेदी केंद्रांवर बारदानाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तर अंबाजोगाईत बारदाना खराब तसेच फाटलेले असल्याने तेथेही खरेदीत अडथळे आले आहेत.
१ लाख क्विंटल तूर केंद्रातच पडून
तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील ३२ हजार ५१९ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. १ फेब्रुवारीपासून ४ मेपर्यंत १९ हजार ४१८ शेतकºयांची १ लाख ९५ हजार ४७६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. यापैकी केवळ ९५ हजार ४७६ क्विंटल तूर गोदामात साठविण्यात आली. उर्वरित १ लाख क्विंटल तूर खरेदी केंद्रांतच पडून आहे.
नुसते खरेदीचे आदेश
तूर खरेदी करा असे आदेश दिले जातात मात्र खरेदीसाठी लागणारा नाफेडचा बारदाना तसेच साठवणुकीसाठी वखार महामंडळाचे गोदाम उपलब्ध करुन देण्यात संबंधित सर्वच विभागांची आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे.