गेवराई : पैठण येथील जायकवाडी धरणातून गुरूवारी रात्री १८ दरवाजे उघडून ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पाचांळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर, राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहेत. पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने गोदावरी काठच्या गावांना प्रभारी तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर, राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पूर्णपणे पाण्यात गेले आहे. पाणीपातळी अधिक झाल्यास तालुक्यातील गुंतेगावं, बोरगांव, पाथरवाला, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिपंळगावं, नागझरी, खामगाव, आगरनादुंर, पांढरी,मिरगावं,पागुळगावं, राजापुर,रामपुरी,भोगलगावं आदि गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो. यामुळे या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
३२ गावे १३ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत२००६ व २००७ साली जायकवाडी धरणातुन अडिच लाख क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकाचे स्थलांतर करण्यात आले होते. पुराने हजारो हेक्टर शेतीचे व घराचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने या गावच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल १३ वर्षानंतरही या गावांचे पुनर्वसन झाले नाही. कोणत्याही लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या ३२ गावातील नागरीक पावसाळ्यात जिव मुठीत घेऊन येथे राहतात.