वृद्ध फिरवत आहेत लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:09+5:302021-03-25T04:31:09+5:30
साडेपाच हजार नागरिकांना दिली लस माजलगाव: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोव्हिड शिल्ड लस नागरिकांना देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने ...
साडेपाच हजार नागरिकांना दिली लस माजलगाव: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाकडून कोव्हिड शिल्ड लस नागरिकांना देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माजलगाव ग्रामीण रुग्णालयासह पाच प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत ५ हजार ५८४ नागरिकांना ही लस देण्यात आली असल्याची माहिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मधुकर घुबडे यांनी दिली आहे.
माजलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात २५ जानेवारीपासून कोव्हिड शिल्ड लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती. याठिकाणी सोमवार पर्यंत ४ हजार ११५ नागरिकांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रात १ मार्च रोजी लसीकरणास सुरूवात होऊन सोमवारपर्यंत १हजार ४६९ नागरिकांना लस देण्यात आली. आरोग्य विभागाने पहिल्या टप्यात आजाराने ग्रासलेले, वयोवृध्द नागरिकांना प्राधान्य दिले होते. मात्र वृध्द नागरिकांनी कोव्हिड शिल्ड लसीकरणाकडे पाठ फिरवली. ४५ ते ६० च्या वयाच्या विविध आजाराने ग्रासलेल्या नागरिकाचे लसीकरणास प्रतिसाद दिल्याचे दिसुन येते.
एकीकडे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी हे घरोघरी जावून वृध्द नागरिकाना कोव्हिड शिल्ड लसीचे महत्व सांगून लस घेण्याची जनजागृती करत आहेत. तरी वृध्द लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी भिती न बाळगता कोव्हिड शिल्ड लस घ्यावी. या लसीचे कसल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे वृध्द नागरिकांनी जास्तीत जास्त लस घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे.
- डॉ.मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी माजलगाव