माजलगाव : पोलिसांनी १६ जूनरोजी रात्री काळ्या बाजारात वाहतूक करणारा साडेतीनशे क्विंटल गहू, तांदूळ शहरात पकडला. परंतु महसूल प्रशासनाने चालढकल करत आरोपींना वाचवण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. दरम्यान, गुरुवारी रात्री अखेर त्या रेशनधान्याबाबत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला .
माजलगाव तालुक्याच्या पुरवठा विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय रेशनचा काळाबाजार होत असल्याची ओरड होत आहे. महसूलच्या वरदहस्तातून हा सर्रास प्रकार घडत आहे. काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू-तांदळाचा साडेतीनशे क्विंटल धान्याचा टेम्पो बुधवारी पोलिसांनी पकडला; परंतु या धान्याबाबत महसूल विभागाने कानावर हात ठेवले. हे धान्य शासकीय पोत्यात ठेवलेले असतानाही हे धान्य ओळखता येत नसल्याने ते तपासणीसाठी कृषी विद्यापीठात पाठवावे, असे सांगून गुन्हा दाखल करण्यास बगल दिली. महसूलच्या या पळकाढू धोरणाने धान्य माफियांसोबत मिलिभगतची तालुक्यात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
पोलिसांनी पकडलेल्या त्या सर्व ६१० गोण्या शासकीय असल्याचे उघड दिसत आहे. परंतु महसूल विभागाने पोलिसांसमोर तांत्रिक पेच निर्माण करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांनी काळ्या बाजारात धान्य घेऊन जाणारा इमरान मुस्तफा खान व आयशर टेम्पोचालक(एमएच २२ ए. एन.२१७५) शेख नसिमुद्दीन या दोघांवर जीवनाश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे दोन छोटे मासे पोलिसांच्या हाती लागले असले, तरी बड्या माशाच्या शोधात पोलीस आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.
दरम्यान, महसूलच्या संबंधित कार्यवाहीबाबत चालढकल केल्याने सर्वसामान्य नागरिकांत महसूल प्रशासनाविरोधात रोष निर्माण होताना दिसत आहे.
===Photopath===
180621\18bed_1_18062021_14.jpg