इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:01 AM2019-02-26T00:01:37+5:302019-02-26T00:08:16+5:30
इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला.
बीड : इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला.
मागील सहा वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम इन्डिपेंडन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशन करीत आहे. या शाळांच्या समस्यांबद्दल शासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र दखल घेतली जात नसल्याने २५ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.
राज्यातील जवळपास ७ हजार ५०० शाळा ईसा संघटनेच्या सभासद आहेत. बीडमधील २० शाळांनी बंदमध्ये सहभागी होत आंदोलनाला प्रतिसाद दिला.
निखिल वाघमारे, भारती बांगर, श्रीमंत सानप, गणेश क्षीरसागर, गणेश धायतिडक, संदीप वारे, गणेश मैड, डॉ. फुलझळके, भागवत अगाम, कलीम इनामदार, सुमित बोर्डे, गोपाल शर्मा, दत्तात्रय देवगुडे, नुर पठाण, केदार वागमारे, नागसेन कांबळे, सुनील जोशी, अर्जुन राठोड, अमर भोसले, भैय्या तोष्णीवाल आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
या मागण्यांसाठी झाले आंदोलन
१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा, २०१२ ते २०१३ पर्यंत आरटीई २५ टक्के प्रवेशाची थकित परतावा रक्कम मिळावी. राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करावा, १८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकाऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर ही जबाबदारी सोपविण्यात यावी. स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर दर्जावाढ प्रस्तावासाठी आॅनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन होते.