परळी (बीड ) : राज्यातील पूरग्रस्त तीन जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पूरग्रस्त जिल्हे हे पर्यटन स्थळ नाही, की टिंगल-टवाळी करण्याचे ठिकाण नाही. या भागातील शेतकऱ्यांना शासनाने तातडींने मदत करावी अशी मागणी अ.भा.किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले यांनी येथे केली
मराठवाडा व विदर्भात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात या भागात मुख्यमंत्र्यांनी दौरे करावेत, बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना किसान सभा जाब विचारेल असा इशारा ही नवले यांनी आज परळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यात दौरा काढून प्रशासकीय बैठका घ्याव्यात, पीक पेरा याची माहिती घ्यावी, मराठवाडा, विदर्भासाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे, सोयाबीनचा पिक विमा द्यावा, विमा कंपनीस रक्कम देण्यास सरकारने भाग पाडावे अन्यथा सरकारने द्यावा अशा मागण्या नवले यांनी केल्या. यावेळी कॉम्रेड पी एस घाडगे, उत्तम माने, देवराव लुगडे, झिरपे आदी उपस्थित होते.