लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आपल्या विविध न्याय मागण्यासाठी मंगळवारी बीड येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र येत विचार मंथन आणि पुढील दिशा ठरविण्यात आली. चार तास आबालवृद्ध यांच्या संमतीने समाजाच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांवर या बैठकीत एकमत करत समाजाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी, संघटनासाठी अनेक संघटना आपापल्या परीने कार्यरत आहेत. परंतु वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून समाजात एक विचार, एक निर्णय होणे अवघड होत आहे. मंगळवारी सुभाष रोड येथील श्रीदत्त मंदिरात ‘ना कोणती संघटना, ना कोणी नेता, ना पदाधिकारी’ या अनुषंगाने ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीचे आयोजन ‘एक ब्राह्मण-नेक ब्राह्मण’ म्हणून करण्यात आले होते. या आवाहनाला समाजाने प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित लावली. सर्वच क्षेत्रातील समाजबांधव परिवर्तनासाठी एकत्र येत एकसंघ असल्याचे दाखवून दिले. तब्बल चार तास बैठक होणे आणि त्यावर समाजाच्या प्रश्न, मागण्या, अडचणी यावर विचार मंथन होऊन त्यावर उपाय व पुढील दिशा यावर एकमत होणारी अत्यंत आशादायी बैठक झाल्याचे समाधान यावेळी व्यक्त केले. बैठकीच्या सुरु वातीलाच मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिल्याबद्दल सरकार आणि मराठा समाजाच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्या वाजवून घेण्यात आला. सध्याच्या बदलत्या स्थितीवर समाजाचे काय मत आहे यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. चार तास चाललेल्या या बैठकीत विचार विनिमय करून सर्वानुमते ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, शिक्षण मोफत करण्यात यावे, या मागण्यावर एकमत झाले. पुरोहितांना मानधन व मुलांना प्रत्येक जिल्ह््यात वसतिगृह उभारण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
हक्कासाठी संपूर्ण ब्राह्मण समाज एकवटणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:50 AM