दिवसभर उमेदवारांनी घेतला झालेल्या मतदानाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:43 PM2019-10-22T23:43:36+5:302019-10-22T23:45:19+5:30
जवळपास दीड-दोन महिन्यांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदान संपल्यानंतर नि:श्वास टाकला.
बीड : जवळपास दीड-दोन महिन्यांपासून प्रचारात व्यस्त असलेल्या उमेदवारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदान संपल्यानंतर नि:श्वास टाकला. मतदानाच्या दिवशी म्हणजे २२ आॅक्टोबर रोजी त्यांच्या दिनचर्येचा आढावा घेतला तेव्हा अनेक जण मतदानाचा आढावा घेण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले.
परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिवसभर आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या परळीत गाठीभेटी घेऊन झालेल्या मतदानावर चर्चा केली. तसेच त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून तेथील माहिती घेतली. आज ते परळीतील निवासस्थानातील संपर्क कार्यालयातच होते.
बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंगळवारी दिवसभर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी दिलखुलास चर्चा केली. त्यांच्या चेहºयावर निवडणूक निकालाचा अजिबात ताण, चिंता दिसत नव्हती. पत्रकारांशीही मनमोकळेपणाने चर्चा केली.
परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ह्या मंगळवारी दिवसभर त्यांच्या परळीतील यशश्री बंगल्यावर होत्या. सकाळी त्यांना भेटण्यास आलेल्या मतदारसंघातील सरपंच, बूथ प्रमुख, विविध संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली व झालेल्या मतदानाची माहिती घेतली.
माजलगाव मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी मंगळवारी सकाळी काही वेळ आराम केला व काही वेळ मतदार संघातील व गावातील लोक भेटायला येत होते त्यांच्या बरोबर घालवला. मला ज्यांनी मतदारसंघात मोलाचे सहकार्य केले, असे शिवाजी रांजवण यांचे वडील सोनाजीराव रांजवण यांचे निधन झाल्याने दुपारनंतर माजलगाव येथे त्यांच्या अंत्यविधीला गेलो, असे रमेश आडसकर यांनी सांगितले.
आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ भिमराव धोडे हे त्यांच्या मंगळवारी आष्टी येथील संपर्क कार्यालयात उपस्थित होते. मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते भेटायला येत होते. त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर मतदानाविषयी सखोल चर्चा केली. आणि आपणच निवडणूक जिंकणार असल्याचे ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे हे मंगळवारी दिवसभर संपर्क कार्यालयात उपस्थित होते. झालेल्या मतदानाविषयी कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होते. त्यांनाही आपणच विजयी होणार असा विश्वास होता.
मतदान संपल्यानंतर आज मंगळवारी नित्यनियमाप्रमाणे श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेतले. जनसंपर्क कार्यालयात जाऊन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मतदान प्रक्रि येवर चर्चा केली. पहिल्याप्रमाणे सुरळीतपणे जनसेवेचे कार्य सुरु ठेवले, असे केज मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी सांगितले.
मंगळवारचा संपूर्ण दिवस आमच्या केज विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी चर्चेत गेला. मतदार संघातून अनेक ज्येष्ठ सहकारी आज चर्चेसाठी उपस्थित होते. निवडणुकीतील घडामोडीवर चर्चा झाली.
आज दिवसभर भेटायला आलेल्या व स्वत: फोन करु ण अनेक सहकारी बंधु, भगिनी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले, केज मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी
सांगितले.