फरार नंदा खुरपुडेला ४१ दिवसानंतर बीडमध्ये बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:12 AM2018-05-15T01:12:15+5:302018-05-15T01:12:15+5:30
व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. तब्बल ४१ दिवसानंतर तिला बेड्या ठोकण्यात एसीबीला यश आले आहे. खुरपुडे ही आपल्या खाजगी वाहनाची नंबर प्लेट काढून औरंगाबादला जात होती. सोमवारी दुपारी तिला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बेड्या ठोकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. तब्बल ४१ दिवसानंतर तिला बेड्या ठोकण्यात एसीबीला यश आले आहे. खुरपुडे ही आपल्या खाजगी वाहनाची नंबर प्लेट काढून औरंगाबादला जात होती. सोमवारी दुपारी तिला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बेड्या ठोकल्या.
व्यायामशाळेसाठी मंजूर झालेले तीन लाख रुपयांचे अनुदान बँक खात्यावर टाकण्यासाठी शिपाई शेख फईमोद्दिन मार्फत ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बीडची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर ३ एप्रिल रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पैकी शिपायाला रंगेहाथ पकडले होते तर खुरपुडे ही फरार झाली होती. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिच्या लातूरच्या घराची झडती घेतली होती. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू त्यांना आढळून आल्या होत्या. त्यानंतर खुरपुडेला पकडण्यासाठी एसीबीची धावाधाव सुरू होती. परंतु ती त्यांना गुंगारा देत होती.
सोमवारी दुपारी ती आपल्या खाजगी कारने बीडमार्गे औरंगाबादला जात असल्याची माहिती बीड एसीबीला मिळाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सापळा लावला. खबºयाने दिलेल्या माहितीवरून त्यांना कार येताना दिसली आणि त्यांनी ती अडविली. यामध्ये खुरपुडे आढळून आली. तिला तात्काळ अटक करून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करणार असल्याचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील म्हणाले.
ना खेद, ना खंत
लाचखोर नंदा खुरपुडे हिला अटक केल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी ती हसत हसत गाडीतून खाली उतरली आणि तपासणी झाल्यानंतर हसत गाडीत बसली. तिच्यासोबत दोन महिला पोलीस कर्मचारी होत्या. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला हातकड्या घालण्याची तसदीही घेतली नाही.
अटकपूर्व जामीन फेटाळला
नंदा खुरपुडेची अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू होती. पहिल्यांदा जिल्हा व नंतर उच्च न्यायालयात तिने धाव घेतली. परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतरही खुरपुडे एसीबीला शरण आली नाही, हे विशेष.
४१ दिवस कोठे होती खुरपुडे?
३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल होताच नंदा खुरपुडे फरार झाली. त्यानंतर तिला ४१ दिवसानंतर बेड्या ठोकल्या. परंतु या दरम्यानच्या काळात ती कोठे होती, असा प्रश्न कायम आहे. एसबीची उपअधीक्षक हनपुडे पाटील म्हणाले, चौकशी केल्यानंतरच या सर्व बाबी समोर येतील.