कडा : तालुक्यातील कुंभेफळ येथे भरदिवसा शेतकऱ्याचे घर फाेडून जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १९ जुलै रोजी घडली.
खरीप पिकांची पेरणी झाली असून, सध्या पिकांची खुरपणी सुरू आहे. त्यामुळे घरातील सदस्य कुलूप लावून शेतात जात आहेत; पण शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरी कोणी नसल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. सध्या खुरपणीचे दिवस सुरू असल्याने घरातील सदस्य लहान- थोरांसह शेतात जातात. घरी कोणीच नसते. त्यामुळे घराला कुलूप लावून सगळे शेतात जातात. १९ जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी कुंभेफळ येथील गाडे वस्तीवरील योगेश गाडे यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून घरातील आठ तोळे सोने, रोख एक लाख रुपये, असा एकूण तीनलाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात योगेश गाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहेत.