अंबाजोगाई (बीड ) : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शेतकऱ्यांचा खरीप पीकविमा-२०१७ आॅनलाईन भरणा रक्कम जमा असूनही अंबाजोगाई तालुक्यात पीक विमा वाटप करत नाहीत. याबाबत बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कारवाईची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ अंबाजोगाईतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, शेतकरी पावसाअभावी अगोदरच अडचणीत सापडला आहे. त्यात थोडीफार आॅनलाईन खरीप पीक विम्यावर अपेक्षा ठेवून आहे. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचीच आॅनलाईन रक्कम प्रत्येक बँकेच्या शाखेत जमा केली असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा आहेत. तरी देखील बँकेचे कर्मचारी देण्यास टाळाटाळ करत आहेत. आॅनलाईन विमा रक्कम हक्काची असूनही दुष्काळात मिळत नाही. शेतकऱ्यांची मानसिक व आर्थिक परेशानी वाढली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांवर जिल्हा बँक अन्याय करत आहे व शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक फसविले जात आहे. शेतकऱ्यांचे पैसे दुष्काळी परिस्थितीत व ऐन सणासुदीच्या काळात बँक शेतकऱ्यांचा पैसा स्वत:साठी वापरत असेल तर यापेक्षा मोठे दुर्देव ते काय? म्हणून बीड जिल्हा बँकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उर्वरित खरीप पिकविमा २०१७ आॅनलाईन भरणा रक्कमा लवकरात लवकर वाटप करण्यात यावा, अशी मागणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याप्रश्नी प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अंबाजोगाई वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा महासंघाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण यांनी दिला आहे. निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.माधव जाधव, नगरसेवक अमोल लोमटे, अॅड. सचिन अडसूळ, रोहन कुरे उपस्थित होते.