कडा- कोरोना महामारीमुळे वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच, वीज महावितरणकडून शेतक-यांचे कनेक्शन तोडण्यात येत असल्याने कांद्यासह गव्हाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतक-यांची वीज तोडणी तात्काळ थांबवावी, अशी मागणी रासपचे मराठवाडा सरचिटणीस डाॅ. शिवाजी शेंडगे यांनी केली आहे.
निवेदनात डाॅ. शेंडगे यांनी म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून जीवघेण्या कोरोनासारख्या महामारीमुळे शेतक-यांसह सर्वसान्य नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत आहे. अशाही कठीण परिस्थितीत राज्य सरकारकडून शेतक-यांना त्रास देण्यात येत आहे. सध्या वीज महावितरण कंपनीकडून शेतक-यांचे थकबाकीसाठी वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्यामुळे विहिरीत पाणी असतानाही केवळ विजेअभावी हातातोंडाशी आलेले कांदा व गव्हाचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांची महावितरणकडून चाललेली वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवावी. नसता रासपच्या वतीने वीज महावितरणच्या अधिका-यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा डाॅ. शेंडगे यांनी दिला आहे.