माजलगाव (बीड) : तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळातील खरीप हंगाम-२०१७ मधील दिलेल्या पिक विम्यावर युनायटेड इंशुरन्स कंपनीनेने हेक्टरी ४२८ रुपयाची लुट केल्याचे सुज्ञ शेतकऱ्यांमुळे उघडकीस आले. याबाबत कंपनीने सुरुवातीस टोलवा टोलवी केली मात्र नंतर फरकाची रक्कम खात्यावर जमा करण्याचे मान्य केल्याने शेतकऱ्यांची ५० लाखाची फसवणूक टळली आहे.
गंगामसला महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी खरीप हंगाम- २०१७ मध्ये युनायटेड इंडीया इन्सुरन्स कंपनीत विमा भरला होता. या हंगामात या मंडळात पाऊस अत्यंत कमी पडल्याने उत्पन्नही अत्यल्प झाले. यामुळे शेतकरीशेतकरी पिक विम्याच्या आशेवर होते. कंपनीने सोयाबिनचा हेक्टरी फक्त ७ हजार १३४ रुपये एवढाच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला. यात ४२८ रुपयाची तफावत आढळून आल्याने आबेगाव येथील शिवाजी शेजूळ, संजय शेजूळ, आसाराम शेजूळ, रमेश बाहेती यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी विभागाच्या पडताळणीत शेतकऱ्यांचे म्हणणे खरे ठरत विमा रक्कमेत ४२८ रुपये कमी देवून कंपनीने लुट केल्याचे उघड झाले.
यानंतर शेतकऱ्यांनी कंपनीचे पुणे येथील कार्यालय गाठले. येथे कंपनी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांनी कृषी कार्यालयाने दिलेली आकडेवारी पाहिली. चूक लक्षात येताच सारवासारव करत कंपनीने उर्वरीत ४२८ रुपये खात्यावर आठ दिवसाच्या आत देण्याचे मान्य केले.
गंगामसलासह किट्टी आडगाव, तालखेड, माजलगाव मंडळातील एकूण ११ हजार ८८७ हेक्टरचा सोयाबीनचा विमा शेतकऱ्यांनी भरला होता. यावरून प्रति हेक्टर ४२८ प्रमाणे शेतकऱ्यांचे ५० लाख ९७ हजार ३१७ रुपये एवढे नुकसान होणार होते. मात्र सुज्ञ शेतकऱ्यांमुळे हे नुकसान वाचले आहे.
अन्यथा नायालयात दाद आठ दिवसात कंपनीने आमचा विमा न दिल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. -रमेश बाहेती, शेतकरी , मोठेवाडी