स्वातंत्र्यदिनी आयोजित लोकप्रतिनिधींचे उपोषण महावितरणच्या लेखी पत्रामुळे स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:24+5:302021-08-15T04:35:24+5:30
दिंद्रुड येथील ३३ केव्हीचे रोहित्र गेल्या एक महिन्यापासून नादुरुस्त असल्याने विजेचा खेळखंडोबा झाला असून वीज पुरवठा बाधित होत ...
दिंद्रुड येथील ३३ केव्हीचे रोहित्र गेल्या एक महिन्यापासून नादुरुस्त असल्याने विजेचा खेळखंडोबा झाला असून वीज पुरवठा बाधित होत असल्याने दिंद्रुडसह देवदहीफळ, कुंडी, नाकलगाव, चोपनवाडी, संगम, बाबळगाव, शिंदेवाडी, जवळा, देवदहीफळ येथील लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांसमवेत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. दिंद्रुड पोलीस स्टेशनने मध्यस्थी करत महावितरणचे अधिकारी व उपोषणकर्त्यांची भेट घडवून तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत नियोजन करण्याचे आवाहन केले. उपकार्यकारी अभियंता धर्मपाल स्थूल यांनी येत्या पंधरा दिवसात नादुरुस्त रोहित्र बदलून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्ती करण्यात येईल, थ्री फेज वीज पुरवठा सुरळीत देण्यासाठी काही दिवस सिंगल फेज विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचे पत्र महावितरणला दिले.
या पत्रावर संगमचे सरपंच भगवानराव कांदे, दिंद्रुडचे माजी उपसरपंच नानासाहेब ठोंबरे, देवदहीफळचे सरपंच श्रीधर बडे, संगमचे उपसरपंच बळीराम डापकर, जवळा सरपंच सतीश मिसाळ, उपसरपंच भागवत साबळे, चाटगावचे उपसरपंच बालासाहेब केकान, शिंदेवाडीचे सरपंच विष्णू शेळके, चोपनवाडीचे सरपंच दादासाहेब बडे, वांगीचे उपसरपंच मदन खाडे, बाभळगावचे सरपंच दत्ता लाटे, गोविंद केकान, सचिन रायकर आदींनी स्वाक्षऱ्या करत उपोषण मागे घेतले आहे.