कड्यात शॉर्टसर्किटने ज्वेलर्सच्या दुकानात भीषण आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:34 PM2020-09-12T13:34:17+5:302020-09-12T13:34:42+5:30
आगीमुळे दुकानातील सर्व वस्तूंचा अक्षरशः कोळसा झाला आहे
कडा : शनिवारी पहाटे अचानक शॉर्टसर्किट होऊन फुलचंद पुनमचंद भंडारी या सोन्याचांदीच्या दुकानात भीषण आग लागली. आगीमुळे दुकानातील सर्व वस्तूंचा अक्षरशः कोळसा झाला असून यात लाखोंचे नुकसान झाल्याचे सराफा दुकानदार दिलीप भंडारी यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील कडा येथे फुलचंद पुनमचंद भंडारी यांचे पेठेत सोन्या, चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी नेहमी प्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. शनिवारी पहाटे त्यांना दुकानातून धुराचे लोट दिसले. अग्निशमन दल आणि इतरांना याची माहिती देत यांनी लागलीच दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण दुकान कवेत घेतले. या भीषण आगीत दुकानातील सोने, चांदीचे दागिने, लॅपटॉप, संपूर्ण फर्निचर, सीसीटीव्ही आणि काही रोख रक्कम जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने आग आटोक्यात आणली. आगीत संपूर्ण दुकानाचा कोळसा झाला असून लाखोंचे नुकसान झाले असल्याचे दुकानदार दिलीप फुलचंद भंडारी यांनी सांगितले.
शॉर्टसर्किटने लागली आग
दुकानातील वायरींग जळाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे नागरिकांनी महावितरणला फोन करून वीज बंद केली. यानंतर अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.ही भीषण आग विझविण्यासाठी अनिल ढोबळे, शंकर देशमुख, रमेश शिरोळे, स्वप्नील मखाना, सुमीत भंडारी, उतरेश्वर वेदपाठक, दिनेश भंडारी, सागर क्षीरसागर, गणेश देवकर, सुधीर देवकर, अमोल जाधव, यांनी प्रयत्न केले.