कडा : शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून २००६-०७ मध्ये कडी नदीवर घाटापिंपरी येथे १० लाख रुपये खर्च करून दोन केटीवेअर बंधारे बांधण्यात आले होते; पण पिंचिंग पक्के न केल्याने पहिल्याच पावसात हे बंधारे फुटले. याला १५ वर्षे झाली तरी साधी दुरुस्ती किंवा नवीन काम केले नसल्याने शेतकऱ्यांना फायदा तर झालाच नाही; पण जमीन वाहून गेल्याने तोटा सहन करावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी आता तरी बंधारा दुरुस्ती करावी; जेणेकरून भविष्यात पाणी आले तर फायदा होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील कडी नदीवर २००६-०७ साली ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग आष्टी अंतर्गत शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येकी पाच लाखांचे दोन के.टी. वेअर बंधारे बांधण्यात आले होते. बंधारे बांधले आणि पहिल्याच पावसात आलेल्या पुराने पिंचिंग तुटून गेल्याने पाण्याची साठवणूक होण्याऐवजी शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा बंधारा फुटून एक-दोन नव्हे तर तब्बल १५ वर्षे झाली तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणीदेखील करण्यात आली नाही किंवा दुरुस्तीसुद्धा करण्यात आली नाही. पाणी साठवून शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होण्याऐवजी १० लाख रुपये झालेला खर्च पाण्यात गेला आहे. आता पावसाळ्यात थोडेफार पाणी साचेल यासाठी किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी कांबळे यांनी केली.
-------
या बंधारा कामाचे दगडी पिंचिंग फुटल्याने माझ्या शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासन दरबारी तक्रारी, उपोषण करून आणि शेवटी वैतागून आत्मदहनाचा इशारा देऊनही कसलाच मावेजा मिळाला नसल्याचे शेतकरी काकासाहेब तळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-------
याबाबत आष्टी येथील पाणीपुरवठा उपअभियंता बी. टी. खेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, या योजनेचा निधी उपलब्ध नाही. दुसऱ्या योजनेतून निधी उपलब्ध झाला तर दुरुस्ती करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
----------
210721\20210721_125604_14.jpg