मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान करत टीका करणार्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात शिरुर कासार (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध यापूर्वी बारामतीमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पडळकर यांच्या समर्थनार्थ बारामती शहरातील भाजप कार्यकर्ते पुढे आले आहेत. भाजपने पडळकर यांच्या समर्थनार्थ येथील भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर, आता बीड शहरातही गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांनी पद्मविभूषण विजेता आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची तुलना कोरोना या रोगाशी करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे, महेबूब शेख यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर पडळकर यांच्याविरुद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरुर कासार येथे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि प्रतिमा जाळत आंदोलन केले होते. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजूनही राज्यात ठिकठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.