लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दवाखान्यातून निघालेले बायोमेडिकल वेस्ट (सलाईन, इंजेक्शन, हँडग्लोव्हज इ.) घंटागाडीत टाकून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला पाच हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांनी ही कारवाई केली. दिवसभर पालिकेचे अधिकारी घरोघरी जाऊन कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन करताना दिसून आले.
बीड शहर सुंदर व स्वच्छ करण्यासाठी पालिका सरसावली आहे. मागील काही दिवसांपासून नवनवीन उपक्रम हाती घेण्यासोबतच दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. रस्त्यावर कचरा टाकणाºयांना " ५०० चा दंड ठोठावल्यानंतर गुरुवारी सकाळी बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत टाकून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूनगर भागातील सम्राट चौकातील जाधव हॉस्पिटलला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दरम्यान, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके, स्वच्छता निरीक्षक आर. एस. जोगदंड, भारत चांदणे, भागवत जाधव, सुनील काळकुटे, ज्योती ढाका यांच्यासह पालिकेचे इतर कर्मचारी व अधिकारी गुरुवारी पहाटेपासूनच रस्त्यावर उतरल्याचे दिसले. घरोघरी जावून सुका व ओला कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन करण्याबरोबरच त्यांना महत्त्व पटवून देताना आढळून आले. हे करीत असतानाच त्यांना दवाखान्यातील कचरा घंटागाडीत टाकल्याचे निदर्शनास आले. डॉ. जावळीकर यांनी जाधव हॉस्पिटलच्या डॉक्टरांना याबाबत जाब विचारला. त्यावर त्यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कायदा व नियमांची माहिती देताच डॉक्टरांनी नमते घेतले अन् पाच हजार रुपये दंड भरला. या कारवाईने डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.सुशिक्षितांकडून उल्लंघनओला व सुका कचरा संदर्भात वारंवार जनजागृती केल्यानंतर काही नागरिक जागरुक झाले आहेत. परंतु काही निगरगट्ट व धनदांडगे लोक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे माहित असतानाही कचरा वेगवेगळा केला जात नाही. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक सुशिक्षित आघाडीवर असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य मात्र कारवाईच्या भीतीने कचरा वेगवेगळा करतात.
कारवाईत सातत्य हवेमागील काही दिवसांपासून पालिकेने रस्ता, नालीत कचरा टाकणाºयांसह घंटागाडीत बायोमेडिकल वेस्ट टाकणाºयांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बीडकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काही नागरिक कारवाईच्या भीतीने कचºयाची योग्य विल्हेवाट लावत आहेत. परंतु जे उल्लंघन करतात त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे.