भरारी पथक तपासणार चारा छावण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:21 AM2019-03-28T00:21:55+5:302019-03-28T00:22:50+5:30
जिल्ह्यातील चारा छावण्यांचा आकडा वाढल्यामुळे व यापुर्वी चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यामुळे चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावण्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
बीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांचा आकडा वाढल्यामुळे व यापुर्वी चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यामुळे चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावण्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
चारा छावणी चालकांकडून शासन नियमांनुसार कार्यवाही होण्यासाठी तसेच छावण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भरारी पथक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहे.
तपासणी पथकामध्ये अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे हे प्रमुख असून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संतोष पालवे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नागनाथ पानढवळे व नायब तहसीलदार संतोष धर्माधिकारी हे सदस्य असतील. जिल्हयात ८५९ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी ३२० चारा छावण्या प्रत्यक्षात चालू झालेल्या आहेत. या छावण्यांमध्ये पशुधनाचा विचार करता शेतकऱ्यांची जनावरे आहेत किंवा नाही, चारा छावणीतील जनावरांची संख्या, शासकीय नियमानुसार सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे.
तहसीलदारांना सूचना
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा दौऱ्यावर चारा छावणी बाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने चारा छावणीतील जनावरांची संख्या ३००० ही कमाल मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत तेथे दुसरी छावणी सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये.
गावातील पशुधन व उपलब्ध चारा व चारा छावणीची आवश्यकता याबाबत विचार करुन कार्यवाही करावी. चारा छावणीतील जनावरांना चांगला आहार, पाणी मिळावे यासाठी नियमित तपासणी केली जावी.
आठवडयातून एक वेळ अचानक भेट देऊन तपासणी केली जावी. तसेच चारा छावण्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे सूचित केले आहे.