आणखी चार गुंड बीड जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:29 AM2019-03-27T00:29:53+5:302019-03-27T00:30:20+5:30
जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
बीड : जिल्ह्यात गुंडगिरी करणाऱ्यांवर हद्दपारीच्या कारवाया केल्या जात आहेत. बीड व धारूर ठाणे हद्दीतील आणखी चार गुंडांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी ही कारवाई केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवायांचा धडाका सुरू असल्याने गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
धारुर ठाण्याच्या पोलिसांनी कृष्णा श्रीरंग सोनटक्के (२७) व नाना उर्फ सूरज बन्सी चव्हाण (२४) यांच्याविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षकांकडे पाठविला होता. दोन्ही आरोपी धारुर मधील रहिवासी असून चोरी, घरफोडीचे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. यासोबतच शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी नीलेश कैलास शिंदे (रा. शाहूनगर) व युवराज सुभाष भंडारी (रा. धोंडीपुरा) यांच्यावर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांच्यावर मटका जुगाराचे गुन्हे नोंद आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या पाठपुराव्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांची धारुरचे उपअधीक्षक अशोक आम्ले व बीडचे उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी चौकशी करुन दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अधीक्षक जी. श्रीधर यांनी चारही आरोपींना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.