वडवणी : येथील ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांच्यात नॉनव्हेज घेण्याच्या कारणावरून चांगलीच ‘फ्रि स्टाईल’ हाणामारी झाली. ही घटना धुलिवंदनाच्या दिवशी वडवणी शहरात घडली. दोघेही दारूच्या नशेत तर्रर्र असल्याचे सांगण्यात आले. या दोघांचीही अपर अधीक्षकांकडून चौकशी केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते.
वडवणी पोलीस ठाणे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या प्रकाराने पुन्हा एकदा हे ठाणे चर्चेत आले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याऐवजी पोलिसांमध्येच वाद झाल्याने खळबळ उडाली आहे. धुलिवंदनाला नॉनव्हेज कोणते घ्यायचे? यावरून त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यात वाद सुरू होता, तेव्हा शहरातील १०० पेक्षा जास्त लोकांचा जमाव जमला होता. काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांची याची गंभीर दखल घेतली. याबाबत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना माहिती देण्यात आली असून अंबाजोगाईच्या अपर अधीक्षकांकडून या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची सध्या वडवणी शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे.
शाब्दिक चकमक झाली अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी शाब्दीक चकमक झाली आहे. याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. त्यांच्या आदेशानुसार यावर पुढील कारवाई केली जाईल. - महेश टाक, सपोनि, वडवणी पोलीस ठाणे