‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाला हवेत पूर्णवेळ अधिष्ठाता - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:38+5:302021-02-17T04:39:38+5:30

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : रुग्णसेवेत सर्वाधिक चांगले वैद्यकीय महाविद्यालय, असा नावलौकिक मिळालेल्या अंबाजोगाई येथील स्वाराती शासकीय ...

Full time superintendent of ‘Swarati’ Medical College - A | ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाला हवेत पूर्णवेळ अधिष्ठाता - A

‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाला हवेत पूर्णवेळ अधिष्ठाता - A

Next

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : रुग्णसेवेत सर्वाधिक चांगले वैद्यकीय महाविद्यालय, असा नावलौकिक मिळालेल्या अंबाजोगाई येथील स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी पूर्णवेळ आणि सक्षम अधिष्ठाता द्यावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार हा सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालय अधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी तडकाफडकी दिला. कोविड प्रादुर्भावाच्या काळात सर्वांचे प्राधान्य कोविड रुग्ण सेवेला असल्यामुळे आणि विद्यमान अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी त्याकाळात केलेल्या कामामुळे डॉ. सुक्रे यांची प्रतिमा एक कार्यक्षम अधिष्ठाता म्हणून निर्माण झाली. याकाळात अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी कार्यालयांतर्गत केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या, आपल्या अनुपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन सहकाऱ्यांच्या मुद्दामहून करवून घेतलेल्या बदल्या व इतर विषयांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. औरंगाबाद-नंदूरबार-अंबाजोगाई हा तिहेरी व्याप सांभाळत असलेले अधिष्ठाता डॉ. सुक्रे हे आता अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूर्णवेळ देऊ शकत नसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. आठवड्यातील केवळ दोन दिवस येथे अधिष्ठाता म्हणून ते वेळ देऊ शकत असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजासह रुग्णसेवेवरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांना पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुनरुज्जीवनासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत वैद्यकीय शिक्षण संचालकांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाला पूर्णवेळ व सक्षम अधिष्ठाता द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

वैद्यकीय सेवा विस्कळीत

आठवड्यातील चार दिवस प्रभारी अधिष्ठाता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला केवळ महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्याव्यतिरिक्त कसल्याही निर्णयावर अथवा दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणींवर निर्णय घेण्याचे अधिकार नसल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अडचणींचा गुंता अधिकच वाढत आहे. परिणामी वैद्यकीय सेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे.

------

अधिष्ठात्यांची तिहेरी कसरत

अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा भार सांभाळत असतानाच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी डॉ. सुक्रे यांच्यावर नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. आता हेडक्वार्टर औरंगाबादला राहून अंबाजोगाई व नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कार्यभार सांभाळण्याची तिहेरी कसरत आपले शारीरिक व्याप सांभाळत सुक्रे यांना करावी लागत आहे.

Web Title: Full time superintendent of ‘Swarati’ Medical College - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.