बीडच्या शेतकऱ्याची किमया, उजाड डोंगरावर खरबूज शेती फुलवून घेतले लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:49 PM2018-05-04T15:49:13+5:302018-05-04T15:49:13+5:30

गडदेवाडीच्या विठ्ठल भागुराम गडदे नावाच्या शेतकऱ्याने बालाघाटातील कामठ नावाच्या उजाड डोंगराच्या माथ्यावर बागायत शेती फुलवून  खरबुजाच्या शेतीतून लाखाचे उत्पन्न घेतले आहे.

Generation of lacquer of Beed's farmer, blooming on melon fields on a hill | बीडच्या शेतकऱ्याची किमया, उजाड डोंगरावर खरबूज शेती फुलवून घेतले लाखाचे उत्पन्न

बीडच्या शेतकऱ्याची किमया, उजाड डोंगरावर खरबूज शेती फुलवून घेतले लाखाचे उत्पन्न

Next
ठळक मुद्देअंबाजोगाई व परळी तालुक्याच्या डोंगर सीमेवर गडदेवाडी शिवार आहे.याठिकाणी विठ्ठल गडदे यांची डोंगरात १२ एकर शेती आहे.

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडीच्या विठ्ठल भागुराम गडदे नावाच्या शेतकऱ्याने बालाघाटातील कामठ नावाच्या उजाड डोंगराच्या माथ्यावर बागायत शेती फुलवून  खरबुजाच्या शेतीतून लाखाचे उत्पन्न घेतले आहे. व्यापाऱ्याच्या नादाला न लागता  स्वत: खरबुजाची विक्री केल्याने अधिक फायदा झाल्याचे विठ्ठल गडदे यांनी सांगितले.

अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या डोंगर सीमेवर गडदेवाडी शिवार आहे. याठिकाणी विठ्ठल गडदे यांची डोंगरात १२ एकर शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेतीतून बाहेर पडण्याचा निर्णय गडदे यांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर हिंमत धरून एक एकरमध्ये निर्मल २२५ वाणाचे खरबुज बियाण्याची सव्वा फूट बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. त्यापूर्वी मशागत करून व  शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. जानेवारी अखेरीस मल्चिंग पेपर अंथरून  खरबूज बियाणे लावण्यात आले. पाणी व्यवस्थापनासाठी विहीर आहे. ठिबक सिंचनाद्वारे पिकासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. 

खरबूज पीक ७० ते ८० दिवसांत काढणीस येते. गडदे यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोसलेले व पक्व झालेले खरबूज व्यापाऱ्यास न देता थेट अंबाजोगाई शहर गाठले. स्वत: चौकात उभारून खरबूज विक्रीसाठी उपलब्ध केले. मित्र आप्पासाहेब गडदे, श्रीराम गडदे यांनी वेळोवेळी मदत केली. २५ ते ३० रुपये प्रती किलोप्रमाणे पाच टन खरबुजाची विक्री केली. एकूण विक्रीतून त्यांना एक लाख रुपये मिळाले. यातील ५० हजार रुपये लागवडीसाठी व इतर खर्च झाला. ७० दिवसात विठ्ठल गडदे यांना ५० हजार रुपये फायदा झाला. यातून मित्रांकडून घेतलेले पैस ेफेडले. 
विशेष म्हणजे शेतकरी विठ्ठल गडदे यांनी मित्र, नातेवाईक, शेजारी या सर्वांना खरबूज खाण्यासाठी शेतात आमंत्रणे दिली होती. जे येऊ शकले नाहीत त्यांना पार्सल पाठवले.

शेती मशागतीसाठी गडदे यांना आई कलुबाई, पत्नी सुमन, मुलगा रामराज्य, धर्मराज यांचे नेहमी सहकार्य असते. वडिलानंतर कुटुंबाची जिम्मेदारी आई कलुबाई यांच्या खांद्यावर आली. आईच्या प्ररणेने विठ्ठल गडदे यांनी शेतात पूर्ण वेळ दिला. नव्यानेच गडदे यांनी यंदा मार्च महिन्यात  काशी फळाची,भोपळ्याची एक एकर क्षेत्रात लागवड केली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत. यातून चांगले उत्पन्न होण्याची त्यांना आशा आहे. 

Web Title: Generation of lacquer of Beed's farmer, blooming on melon fields on a hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.