गेवराईत मध्यरात्रीचा थरार; दबा धरून बसलेले पाच दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:17 PM2018-05-03T18:17:54+5:302018-05-03T18:17:54+5:30
रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या चकलांबा पोलिसांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना जेरबंद केले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
गेवराई (बीड ) : रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या चकलांबा पोलिसांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना जेरबंद केले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. दरोडेखोरांकडून कटर, करवत, हातोडी, मिरचीपूड आदी साहित्य जप्त करण्यात आले.
सोमवारी रात्री चकलांबा ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे आणि सहा. फौजदार थोरात आणि जमादार हे उमापुरपर्यंत गस्त घालून माघारी चकलांबा जवळ आले होते. मध्यरात्री १ वाजता चकलांबा फाट्याकडे जात असताना त्यांना गावाबाहेरील रत्नेश्वर मंदिराजवळील देवतळ्यात एक व्यक्ती दबा धरून बसलेला आढळून आला. आवाज देऊनही तो प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांना शंका आल्याने त्यांनी सर्च लाईट मारून आजूबाजूला पहिले असता आणखी काही व्यक्ती दबा धरून बसल्याचे दिसून आले. सदरील लोक हे दरोडेखोर असल्याची खात्री झाल्याने गुरमे यांनी ठाण्यात फोन करून कर्मचारी मोरे, नांगरे, ओव्हाळ यांना बोलावून घेतले आणि तळ्याकडे निघाले.
पोलीस येत असल्याचे पाहून दरोडेखोराने त्यांच्यावर दगडफेक सुरु केली. तश्याही परिस्थितीत पोलिसांनी पुढे जात त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आणखी चौघेजण मंदिरात लपले असल्याचे सांगितले. त्यांनतर पोलिसांनी मंदिराला घेरा घालून चौघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याजवळील पिशवीतून कटर, करवत, हातोडी, मिरचीपूड, स्क्रू-ड्रायव्हर, पाने आदी दरोड्यासाठी आवश्यक सामग्री आणि एक विना क्रमांकाची मोटारसायकल जप्त केली. या दरम्यान अन्य दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या दरोदेखोरात शिवाजी श्रीराम खाडे, आकाश संज साबळे, महेश शिवाजी खाडे आणि दोन अल्पवयीन (सर्व रा. केकत पांगरी, ता. गेवराई) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक गुरमे यांच्या फिर्यादीवरून सर्व दरोडेखोरांवर कलम ३९९ अन्वये चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
साहित्यासह चौघे जण घेतले ताब्यात
चकलांबा फाट्याकडे जात असताना गावाबाहेरील रत्नेश्वर मंदिराजवळील देवतळ्यात एकजण दबा धरुन बसलेला आढळला. पोलिसांना सर्चलाईटमध्ये पाहिले असता आणखी आणखी काही लोक आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला व चौघांना यावेळी ताब्यात घेतले.