५० वऱ्हाडींतच लावा विवाह, क्लासेसमध्येही ५० टक्केच उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:03 AM2021-02-18T05:03:36+5:302021-02-18T05:03:36+5:30
बीड : लॉकडाऊनमध्ये ५० लोकांच्या उपस्थितीच विवाह लावण्याचा जो नियम होता, तोच आता आणखी कडक करण्यात आला आहे. कोचिंग ...
बीड : लॉकडाऊनमध्ये ५० लोकांच्या उपस्थितीच विवाह लावण्याचा जो नियम होता, तोच आता आणखी कडक करण्यात आला आहे. कोचिंग क्लासेसमध्येही ५० टक्के उपस्थितीतच वर्ग भरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले आहेत. याबाबत तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेता बीडमध्येही कडक उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लॉकडाऊन उघडल्यानंतर नागरिक गाफील झाले होते. मास्क वापर न करणे, साेशल डिस्टन्स, सॅनिटायझर, आदी कोरोना नियमांचे पालन न केल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले. लग्न सोहळेही धुमधडाक्यात होत आहेत. कोचिंग क्लासेसमध्येही गर्दी करून विद्यार्थी बसविले जात आहेत. हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर ठेवून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लग्न सोहळ्याला पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच ५० वऱ्हाडींनाच परवानगी असणार आहे. तसेच क्लासेसमध्येही सर्व कोरोना नियमांचे पालन करून ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केेल्या आहेत. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना या प्रकरणात तपासणी करून कारवाई करण्यासाठी स्वतंत्र दोन अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. हे सर्व आदेश जुनेच असून, आता केवळ त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने सूचना करण्यात आल्या आहेत. एवढ्या दिवस प्रशासनाने काहीच उपाययोजना अथवा जनजागृती केली नसल्याचे दिसून येत होते.