सरपण आणण्यास गेलेल्या चिमुकलीचा कालव्यात बुडून मृत्यू; मजुरीस गेलेल्या पालकांना करत होती मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 08:30 PM2018-04-20T20:30:38+5:302018-04-20T20:30:38+5:30
मजुरीस गेलेल्या आईला मदत व्हावी म्हणून ती आपल्या आजोबासोबत सरपण आणण्यासाठी शेतात गेलेल्या ११ वर्षीय सुप्रिया वैजनाथ गायसमुद्रे हिचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
अंबाजोगाई ( बीड) : मजुरीस गेलेल्या आईला मदत व्हावी म्हणून ती आपल्या आजोबासोबत सरपण आणण्यासाठी शेतात गेलेल्या ११ वर्षीय सुप्रिया वैजनाथ गायसमुद्रे हिचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (दि.१८ ) मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यात ती पाय घसरून बुडाली होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह कोपरा शिवारातील कालव्यात आढळून आला.
सुप्रिया तालुक्यातील धानोरा खु. येथील रहिवासी होती. तिने नुकतीच सहावीची परीक्षा दिली होती. शाळेला सुटी असल्याने ती मजुरी करणाऱ्या पालकांना घरकामात मदत करत असे. बुधवारी ( दि. १८ ) जळणासाठी सरपण आणण्यासाठी सुप्रिया आपल्या आजोबा सोबत शेतात गेली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुप्रिया सरपण घेऊन परत घराकडे निघाली. या दरम्यान सुप्रिया धानोरा खु. शिवारात असलेल्या मांजरा नदीच्या डाव्या कालव्यातील पाण्यात ती हात धुण्यासाठी गेली. कालव्याला सिमेंटचे ओटे असल्याने ते गुळगुळीत आहेत. यामुळे तिचा त्यावरून पाय घसरला व ती पाण्यात पडली व पुढे वाहुन गेली.
काही वेळाने सरपण तोडत असलेल्या आजोबांनी सुप्रियाला पाहिले असता ती दिसून आली नाही. यानंतर आजोबांनी तिचा आजूबाजूस शोध घेतला. यावेळी कालव्यावर तिचे चप्पल आढळून आले. यावरून तिचा मृतदेह शोधण्यासाठी कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. गुरुवारी पाणी कमी झाल्यानंतर कोपरा शिवारात असलेल्या पाईपला सुप्रियाचा मृतदेह अडकल्याचे काही नागरिकांना दिसून आला. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात आस्कमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.