सराफा, सुवर्णकारांचा बीड जिल्ह्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:03 AM2018-08-23T01:03:41+5:302018-08-23T01:04:26+5:30
बीड : सराफा, सुवर्णकारांनी पुकारलेल्या मराठवाडा बंदला बुधवारी बीड जिल्ह्यातील सराफा, सुवर्णकारांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. जिल्ह्यातील ९१३ दुकाने बंद होती.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ व्यावसायिक शाम घाडगे व गणेश घाडगे यांच्यावर झालेला गोळीबार, लूट आणि हत्या तसेच पोलिसांच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपूर येथील सराफा व्यावसायिक गोरख मुंडलिक यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या अन्यायाविरूद्ध हा बंद पुकारण्यात आला होता.
जिल्ह्यातील सराफा दुकाने कडकडीत बंद होती, कोळपेवाडी व श्रीरामपूर घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षक तसेच तालुकास्तरावर पोलीस आणि प्रशासनाला निवेदने देण्यात आली. याप्रकरणी योग्य कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश बेदरे, सचिव मंगेश लोळगे तसेच तालुकाध्यक्ष रामराजे रांजवण (माजलगाव), शेख जुनेद (अंबाजोगाई), गोविंद कन्से (केज), विठ्ठल आंधळे (वडवणी), सतीश बेद्रे (आष्टी), राजाभाऊ निर्मळ (धारूर), वैभव शहाणे (गेवराई), विजय कुल्थे (शिरूर कासार), मोरेश्वर बेद्रे (पाटोदा), राहुल टाक ( परळी), कल्याण डहाळे (बीड) यांच्यासह सराफा बांधवांनी निवेदनाद्वारे केली.