ग्रामपंचायत निवडणूक : चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:23+5:302020-12-31T04:32:23+5:30

माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही वेळ बाकी असतांना अर्ज दाखल करण्यासाठी ...

Gram Panchayat Election: Cousin's candidature application torn by nephews | ग्रामपंचायत निवडणूक : चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

ग्रामपंचायत निवडणूक : चुलत्याचा उमेदवारी अर्ज पुतण्यांनी फाडला

Next

माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही वेळ बाकी असतांना अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या चुलत्याचा अर्ज हातातून हिसकावून घेत पळ काढत तहसील कार्यालय आवारातच फाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली.

तालुक्यात पहिल्या टप्प्यात पाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यातच ऑनलाईन अर्ज दाखल करतांना सर्व्हर डाऊन होत असल्याने निवडणूक विभागाने ऑफलाईन अर्ज स्वीकारले. त्याकरिता सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ वाढवून दिला होता. सर्वच अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची दिवसभर पळापळ चालू होती. याच दरम्यान सायंकाळी साडेचारच्या दरम्यान तहसील कार्यालय आवारात दिंद्रुड ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी अशोक हरिनाथ कोमटवार हे आले असता, त्या ठिकाणी त्यांचे पुतणे अक्षय दिलीप कोमटवार, अजय दिलीप कोमटवार, अमित दिलीप कोमटवार यांनी अशोक कोमटवार यांना धक्काबुक्की करत हातातील अर्ज हिसकावून घेतला. त्या ठिकाणाहून पळ काढत तहसील कार्यालयाबाहेर येऊन अशोक कोमटवार व त्यांचा मुलगा निखिल अशोक कोमटवार या दोघांचा उमेदवारी अर्ज टराटरा फाडला. यामुळे तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता.

यानंतर अशोक कोमटवार यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. परत पुन्हा कागदपत्रांची जमवाजमव करत अर्ज भरला. यावेळी त्यांना चांगलाच घाम फुटला होता. शेवटी त्यांनी वेळेत अर्ज दाखल केला.

पोलिसांची बघ्याची भूमिका, तर तहसीलदारांचे कानावर हात

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या हातातील दोन उमेदवारी अर्ज घेऊन त्यास मारहाण करत अर्ज फाडण्याची घटना तहसील कार्यालय आवारात घडली. ही घटना होत असतांना समोरच उभे असलेल्या पोलिसांना अशोक कोमटवार बचावासाठी आवाज देत होते. मात्र उपस्थित पोलिसांनी याकडे डोळेझाक करून एक प्रकारे या घटनेला पाठबळ देण्याचे काम केले. तहसीलदार वैशाली पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी हा प्रकार तहसील कार्यालयात झाला नसून तो बाहेर झाला असल्याचे सांगत कानावर हात ठेवले.

Web Title: Gram Panchayat Election: Cousin's candidature application torn by nephews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.