स्वारातीच्या कोविड हॉस्पिटलला रुग्णांचा मोठा ताण; - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:18+5:302021-03-26T04:34:18+5:30
८ डॉक्टरांच्या रिक्त पदांकडेही महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या ...
८ डॉक्टरांच्या रिक्त पदांकडेही महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला कोविडच्या सामान्य रुग्णांचा मोठा ताण जाणवत आहे. कोविडची रुग्ण सेवा सांभाळणाऱ्या मेडिसीन विभागात रिक्त असणाऱ्या डॉक्टरांच्या आठ जागा भरण्याच्या प्रक्रियेकडेही महाविद्यालयाचे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा होत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढत जाणाऱ्या कोविडला प्रतिबंध करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालयासोबतच लोखंडी सावरगाव येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. यासोबतच स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात डीसीएच (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल) सुरू करण्यात आले. अतिअस्वस्थ कोविड रुग्णांवरच स्वारातीच्या डीसीएचमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात यावेत व इतर ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सामान्य रुग्णांवर सार्वजनिक आरोग्य विभागाने उपचार करावेत असे स्पष्ट निर्देश शासनाने यावेळी दिले होते. मात्र, हे सर्व संकेत बाजूला ठेवत स्वारातीच्या डीसीएच कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर मेडिसीन विभागाचे सर्व डॉक्टर्स आजपर्यंत उपचार करीत आहेत.
रुग्ण सेवेचा ताण..!
स्वारातीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी ही पूर्णतः मेडिसीन विभागाकडे आहे. मेडिसीन विभागाकडे यापूर्वीच बाह्यरुग्ण विभाग, पुरुष विभागाचे २ वॉर्ड, महिला रुग्णांचे २ वॉर्ड आणि अतीदक्षता विभाग या पाच आंतररुग्ण कक्षातील रुग्ण आणि कॅज्युअलटीतून येणारे कॉल यामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या शुश्रूषेची जबाबदारी आहे. कोविडच्या या नव्या संसर्गामुळे आता पाच नव्या आंतररुग्ण कक्षाची वाढ झाली आहे. आणि या पाचही आंतररुग्ण कक्षात कोविडची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.
डॉक्टरांची मोठी कमतरता; प्रशासनाचे दुर्लक्ष स्वारातीच्या डीसीएच कोविड सेंटरमध्ये आज जवळपास ८० रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्तचा रुग्णसेवेचा ताण वेगळाच आहे. त्यातही रुग्णसेवेचा हा ताण सांभाळणाऱ्या मेडिसीन विभागात गेल्या अनेक दिवसांपासून ४ लेक्चरर आणि ४ एसआरच्या अशा एकूण ८ जागा रिक्त आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि क्षमतेपेक्षा कमी डॉक्टर या सर्वांचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. असे असताना मेडिसीन विभागांतील ८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिष्ठाता कार्यालयाकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. भूलशास्त्र व इतर विभागांतील डॉक्टर कोविडकडे वळवा
गेल्या वर्षी कोविड रुग्णसंख्या वाढली असता मेडिसीन विभागातील डॉक्टरांचा रुग्णसेवेचा वाढत जाणारा ताण कमी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी भूलशास्त्र विभागातील डॉक्टरांकडे कोविड वॉर्डाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मदतीला मेडिकल कॉलेजमध्ये एक वर्षाच्या बॉण्डवर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकऱ्यांना नियुक्त केले होते. आज कोविडची रुग्ण संख्या वाढत असताना विद्यमान अधिष्ठाता यांच्याकडून कसल्याही प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसत नाही.
जळगाव येथील प्रतिनियुक्तीचा घाट कशासाठी ? या संदर्भात स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की राज्यात जिथे रुग्णांची संख्या वाढते तिथे मुंबई येथूनच प्रतिनियुक्त्या दिल्या जातात. ठरावीक कालावधीसाठी हे डॉक्टर प्रतिनियुक्त्यावर आहेत.