किराणाची तुटली, पण कोरोनाची साखळी तुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:43+5:302021-05-29T04:25:43+5:30
बीड : प्रशासनाच्या आदेशानुसार मागील १५ -२० दिवसांपासून किराणा दुकाने बंद आहेत, तर आता घरातला किराणाही संपला आहे. या ...
बीड : प्रशासनाच्या आदेशानुसार मागील १५ -२० दिवसांपासून किराणा दुकाने बंद आहेत, तर आता घरातला किराणाही संपला आहे. या कालावधीत दुकाने बंद राहिल्याने गर्दीचा प्रश्नच राहिला नाही. आतातरी कोरोनाची साखळी तुटेल, असे वाटले. परंतु कोरोनाचे रुग्ण घटण्याचे प्रमाण फारसे समाधानकारक दिसून आलेले नाही. किराणाची तुटली, पण कोरोनाची साखळी तुटेना, अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. किराणा दुकानांमुळे कोरोना पसरतो आणि किराणा बंद केल्याने कोरोना थांबेल, हे दोन्ही निष्कर्ष मात्र सध्यातरी फोल ठरल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. सचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणारे, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. सुरूवातीपासून जीवनावश्यक असलेला किराणा प्रशासनाच्या यादीतून अनावश्यक झाला. किराणा दुकानेही इतर आस्थापनांप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश झाले. ही दुकाने कधीपर्यंत बंद ठेवली जाणार, याची स्पष्टता नसल्याने काही ग्राहकांनी अधिकची खरेदी करून तजवीज केली, तर अनेकांनी आर्थिक अडचणींमुळे क्षमतेइतकी खरेदी केली. आता खरेदीसाठी मोठा खंड पडल्याने घराघरातील किराणा संपत आला आहे, तर काहींचा किराणा संपला आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचा रोजगार बंद आहे. अशा घरांमध्ये परिस्थती बिकटच आहे. किराणा दुकाने कधी उघडतील, याची प्रतीक्षा करीत लॉकडाऊनच्या बातम्यांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत ग्राहक त्रस्त, तर दुकानदार बेजार झाले आहेत. व्यवसायासाठी गुंतविलेल्या भांडवलाचेे अन लॉकडाऊनमुळे होत असलेल्या नुकसानीची चिंता त्यांना सतावत आहे, तर अधिकाऱ्यांना घरी किराणा लागत नाही काय, असा संतप्त सवाल एका सामान्य ग्राहकाने केला.
बंद दुकान उंदरांना मोकळे रान
लॉकडाऊन शिथिल होताच किराणा व्यापाऱ्यांना नव्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. कुलूप उघडले, शटर उचलताच कोळ्याने विणलेले जाळे सारून प्रवेश करावा लागेल. त्यानंतर दुकानात उंदरांनी घातलेला धुमाकूळ नजरेस पडणार आहे. मसाल्याच्या बरण्यांचे तुकडे विखुरलेले आढळतील. फोडलेले मॅगीचे पुडे अस्ताव्यस्त दिसतील. पाण्याअभावी कासावीस उंदरांनी गोडेतेलाच्या पुड्याला पाणी समजून फोडलेले व दुकानात तेलच तेल पसरलेले दिसेल. बिस्किटांच्या पुड्यांचा उंदरांनी अक्षरशः फडशा पाडला असणार. हवा न मिळाल्याने शेंगदाण्याला बुरशी चढलेली असणार. शाम्पूच्या बाटल्या, लोणच्याच्या बरण्या फुटलेल्या दिसतील. इतर खाद्यपदार्थांचेही नुकसान दिसणार आहे. नुकसानीचा हा आकडा पंचनाम्यात नोंदला जाणार नाही. शेंगदाण्याचे दोन कट्टे जरी खराब झाले तर किमान दहा हजारांचे नुकसान होते. इथे तर शेकडो दुकानांमध्ये उंदरांना रान मोकळे होते. नोकरांचा पगार, दुकानाचे भाडे, बँकेच्या व्याजाचा भुर्दंड आहेच. गतवर्षीच्या नुकसानीतून अजूनही सावरलेले नसताना परत यावर्षी अजून हा फटका किराणा व्यावसायिकांना बसणार आहे. दुकाने उघडल्यानंतर परत तेजीच्या दराने खरेदी केलेला माल मंदीत विकावा लागणार असल्याने कंबरडे मोडणार आहे.