पीक कर्जाचा वेग २० टक्क्यांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:02 AM2019-07-22T00:02:28+5:302019-07-22T00:02:56+5:30
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २५ हजार ४४८ पात्र शेतकऱ्यांना मागणीनुसार १३८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील २५ हजार ४४८ पात्र शेतकऱ्यांना मागणीनुसार १३८ कोटी ८४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कर्जवाटपाचे प्रमाण १९. ३५ टक्के इतके आहे.
खरीप हंगामात गरजू व पात्र शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली होती. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पीक कर्ज मागणीचे प्रमाण नसल्यासारखेच होते. मात्र हंगाम सुरु होण्याआधी मेच्या दुस-या आठवड्यापासून कर्ज मागणीचे प्रस्ताव शेतकरी करत होते. जिल्हाधिका-यांनी बॅँकर्स समितीची बैठक घेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी सूचना दिल्या होत्या. तसेच दर सोमवारी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले. तर जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला.
बॅँकांना तसेच शेतक-यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयक म्हणून कामकाज सुरु ठेवले. काही बॅँकांकडून कर्ज वाटपास विलंब होत असल्याच्या तसेच इतर तक्रारी होत्या. तर काही प्रकरणात शेतक-यांनी एकापेक्षा जास्त बॅँकेकडून कर्ज घेतलेले असल्याची माहिती त्यांच्या सीबिल रिपोर्टमुळे स्पष्ट झाली. मात्र बॅँकांनी त्यांचे काम व्यस्थित व गतीने सुरु ठेवल्याने पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही घटले आहे. जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत १७ बॅँकांच्या मार्फत १८३ कोटी ८४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
यंदा टक्का वाढणार
कर्जमाफीमुळे अनेक शेतक-यांना कर्ज घेणे सुलभ झाले आहे. थकबाकी नसलेल्या पात्र शेतक-यांचे प्रस्ताव निकाली काढले जात आहेत.
मागील वर्षी खरीप हंगामात वाटप केलेल्या कर्जाचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत २५ टक्के इतके होते.
खरीप हंगाम ३० सप्टेंबरपर्यंत असल्याने तसेच दमदार पाऊस झाल्यास मागणी होऊ शकते.
त्यामुळे आतापर्यंतच्या कर्ज वाटपानुसार या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
२०१९-२० खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, व्यावसायिक आणि राष्टÑीयकृत अशा १७ बॅँकांना एकूण ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले असून त्यांच्या मार्फत कर्ज वाटफाची प्रक्रिया सुरु आहे.