गुत्तेदाराला मारहाण करून ४७ हजारांचा ऐवज हिसकावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:16+5:302020-12-31T04:32:16+5:30
अंबाजोगाई : कामानिमित्त तहसील कार्यालयात निघालेल्या बांधकाम गुत्तेदाराला १० जणांनी रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी ...
अंबाजोगाई : कामानिमित्त तहसील कार्यालयात निघालेल्या बांधकाम गुत्तेदाराला १० जणांनी रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी गुत्तेदाराजवळील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा ४७ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. ही घटना मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरात वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयासमोर घडली.
विजय देवीदास तरकसे (रा. नागसेननगर, अंबाजोगाई), असे बांधकाम गुत्तेदाराचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान ते कामानिमित्त तहसील कार्यालयाकडे कारने (क्र.एमएच १४ बीएक्स ८३५२) निघाले होते. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयासमोर गोविंद सुधाकर शिंपले (रा. धनगर गल्ली, अंबाजोगाई) आणि इतर नऊ जण त्यांच्या कारजवळ आले. गोविंद शिंपले याने कारची चावी काढून घेतली. तरकसे यांनी याबाबत जाब विचारताच गोविंद आणि त्याच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करून काठी, बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी तरकसे यांना बेदम मारहाण केली आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोविंदने तरकसे यांच्याजवळील सोन्याची अंगठी, चेन आणि खिशातील रोख ३ हजार, असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि जिवे मारण्याची धमकी दिली, असे तरकसे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून १० आरोपींवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये करीत आहेत.