शेतकऱ्यांना नेहमीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त होतो, तर कधी सतत पडणाऱ्या दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत असतो. आता पीक चांगले आले, तर मोठ्या प्रमाणात हरणांच्या उपद्रवाला शेतकरी वैतागला आहे. पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत हरणांच्या कळपाला हुसकून लावण्यासाठी शेतात राहावे लागत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. किल्लेधारूर तालुक्यातील मैदवाडी शिवार, घागरवाडा, जहागीरमोहा, रेपेवाडी, अरणवाडी या भागात मोठ्या प्रमाणात वावर करत असल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे. याकडे वनविभागाने लक्ष घालणे गरजेचे असून, तत्काळ याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
या वर्षी पाऊस वेळेवर झाल्याने पिके चांगली आली आहेत, पण हरणांचा कळप पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे रोज पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पिकाची राखण करावी लागत आहे. त्यामुळे शेतातील राहिलेले काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी विजय शिनगारे यांनी केले आहे.