अंबाजोगाई : अंबाजोगाईत महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने या अधिकारी महिलेच्या संपर्कात आलेल्या विविध विभागातील ४० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरूच आहे. ही यादी मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे समोर येत आहे.
महसूल प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी महिलेस त्यांची मैत्रीण व मुलगा भेटण्यासाठी अंबाजोगाईच्या विमल सृष्टी या परिसरात आले होते. अंबाजोगाईत आल्यानंतर ती मैत्रीण महिला बाधित निघाली. त्यानंतर त्या उच्चपदस्थ अधिकारी महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर ती महिला अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या शासकीय वाहनचालक, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी याशिवाय त्यांच्या भेटीसाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी अशा चाळीस जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे.
रविवारी झाली होती बैठकमहसूल प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी यांनी रविवारी अंबाजोगाईच्या एका कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीस अंबाजोगाई, परळी, केज, धारूर व माजलगाव येथील महसूल, कृषी, वन विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले होते. या शिवाय अंबाजोगाई येथील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतील कोणाकोणाचा संपर्क आला. याचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. ही यादी किती लांबत जाते. हे आरोग्य विभागाच्या संशोधनावर ठरणार आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. आवश्यकतेप्रमाणे त्या त्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्णअंबाजोगाई शहरात कोरोनाचे १४ तर अंबाजोगाई तालुक्यात बागझरीत २ तर हनुमंतवाडी १ असे एकूण १७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आजपर्यंत अंबाजोगाई परिसरात ७ ठिकाणी कन्टेमेंट झोन लागू करण्यात आला आहे. शहरी भागातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे.