बीड : पोलीस प्रशासनात बंदोबस्तासाठी होमगार्डची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक महत्त्वाच्या काळत होमगर्ड बंदोबस्तावर असतात त्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होते. मात्र, नोव्हेंबरपासूनच्या कामाचा भत्ता निधीअभावी रखडला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच शासनाने निधीची कमतरता असल्याचे कारण पुढे करून होमगार्डचे कामही बंद केले आहे.
जिल्ह्यातील होमगार्डची संख्या १०९२ इतकी आहे. निवडणूक, सभा, रॅली, मिरवणुका, जयंती यासह मोठे सणसमारंभ आदींसह अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन होमगार्डची मदत घेते. याबदल्यात ज्या दिवशी काम असेल त्या दिवसाचा भत्ता ५०० रुपये इतका मिळतो. वर्षभरात प्रत्येक होमगार्डला किमान ५० ते १०० दिवस काम मिळणे गजेचे आहे. मात्र, कोरोनाच्या काळात राज्य शासनाकडे निधीची कमतरता असल्यामुळे कामावरून कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, होमगार्डला केलेल्या कामाचे मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
प्रतिक्रिया
ऑक्टोबर २०२०पर्यंतचे मानधन होमगार्डला मिळालेले आहेत. तसेच कोरोनाच्या काळात आवश्यक तेवढा बंदोबस्तासाठी कामदेखील त्यांना मिळाले आहे. १ फेब्रुवारी २०२१ पासून कोविड बंदोबस्त रद्द करण्यात आला आहे. चालू वर्षात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या आनुषंगाने बंदोबस्त नेमला जाईल.
सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड
दोन महिन्यांचा भत्ता मिळाला आहे, तीन महिन्यांचा मिळणे बाकी आहे. काम बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघली असून, पुन्हा लॉकडाऊन पडल्यानंतर परिस्थिती वाईट होणार आहे.
शेख तौफिक, होमगार्ड बीड
काम देणे गरजेचे आहे तसेच थकलेले मानधनदेखील देण्यात यावे, बेरोजगारीमुळे कुटुंब अडचणीत आले आहे. इतर कामेदेखील बंद झालेली आहेत.
राजाभाऊ मोटे, होमगार्ड बीड
तीन महिन्यांचे मानधन थकले आहे, हा चौथा महिना आहे. होमगार्ड महासमादेशक यांनी गृहमंत्र्यांकडे निधी मागणी केली आहे. मात्र, पैसे नसल्यामुळे मानधन मिळत नसल्याची माहिती आहे. तसेच दोन्हीच्या वादत आमचं काम बंद झालं आहे. ,
रंजित राजपूत, होमगार्ड, बीड