हॉटेल, हातगाडे, फळ व्यावसायिकांची अॅन्टीजेन टेस्टकडे फिरवली पाठ; प्रशासनाकडून एकही कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:06+5:302021-03-25T04:31:06+5:30
माजलगाव : काेरोनाचे दिवसेंदिवस रुग्णांत वाढ होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देत व्यापाऱ्यांना अॅन्टीजेन टेस्ट करणे बंधनकारक केले. ...
माजलगाव : काेरोनाचे दिवसेंदिवस रुग्णांत वाढ होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर आदेश देत व्यापाऱ्यांना अॅन्टीजेन टेस्ट करणे बंधनकारक केले. मात्र, अद्यापही माजलगाव शहरासह तालुक्यात हातगाडे, फळ व्यावसायिकांनी अॅन्टीजेन टेस्ट करण्यास पाठ फिरविली आहे, असे असताना ही, प्रशासनाने दुर्लक्ष करत एकही कारवाई केलेली नाही.
माजलगाव तालुक्यात मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जास्त संपर्कात असणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक केले होते. सुरुवातीस व्यापाऱ्यांनी या टेस्टकडे पाठ फिरविली होती, परंतु, प्रशासनाने अॅन्टीजेन टेस्ट करा, अन्यथा दुकाने उघडू देणार नाही, अशी सक्त ताकीद दिली. त्यावर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अॅन्टीजन टेस्ट केल्या; परंतु, यात हातगाडे, फळ व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिकांनी सपशेल या अॅन्टीजेन टेस्टकडे पाठ फिरवली आहे. हे व्यावसायिक ही मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या संपर्कात येतात, कारण याचे व्यवसाय हे मुख्य रस्त्यावरच आहेत. ही बाब स्थानिक प्रशासनाने कामाचा लोड नको, म्हणत दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. परंतु, आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर यास प्रशासनास या चुकीची किंमत मोजावी लागेल.
न.प.चे पथक नावालाच
प्रशासनाने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अँन्टीजन टेस्ट अनिवार्य केली होती. मोठ्या व्यावसायिकांनी अँन्टीजन टेस्ट करून घेतल्या परंतु शहरातील छोट्या हाॅटेल, फळविक्रेते, गाडेवाल्यांनी अद्याप कोरोना टेस्टच केल्या नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
कोणी टेस्ट केली की नाही हे पाहण्यासाठी नगरपालिकेने आठ दिवसांपूर्वी ३-४ वेगवेगळी पथकांची नेमणूक केली. मात्र, शहरातील २५ ते ३० टक्के व्यापाऱ्यांनी अँन्टीजन टेस्ट केलेल्या नसताना या पथकाकडून आठ दिवसांत एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.