शंभर एकर जमीन अपहार प्रकरण; बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड 'मुन्ना' अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 02:44 PM2021-09-20T14:44:33+5:302021-09-20T14:45:34+5:30
crime in Beed : या प्रकरणातील देवस्थानाची जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली, महसुल दरबारी कोणी चकरा मारल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले याचा मास्टर माइंड कोण याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
- नितीन कांबळे
कडा ( बीड ) : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमिन बनावट समंतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड मनोज उर्फ'मुन्ना' रत्नपारखे यास आष्टी पोलिसांनी रविवारी अटक केली.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाची जमीन दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबूलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जिमनीची देखभाल करत होते. पण 2020 मध्ये या जमिनीची परस्पर खरेदी झाल्याचे समजात याचा पाठपुरावा करून बनावट व खोटे दस्तावेज निदर्शनास येताच ३ सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तीन प्राध्यापक, एक मुख्याध्यापक, एक विद्यमान सरपंच व अन्य एकाचा समावेश होता.
हेही वाचा - हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू
या प्रकरणातील देवस्थानाची जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली, महसुल दरबारी कोणी चकरा मारल्या, कोणत्या अधिकाऱ्यांला हाताशी धरले, याचा मास्टर माईड कोण? हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, आरोपींची पोलिस कोठडी संपताच ते जामिनावर सुटले. तेव्हापासून आष्टी पोलिस जमीन परस्पर नावावर करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करणारा यातील मास्टर माइंड असलेला मनोज उर्फ मुन्ना रत्नपारखे ( रा.आष्टी ) याच्या मागावर होते. रविवारी खबऱ्याने आरोपी मुन्ना आष्टी पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती दिली. यावरून पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, सचिन कोळेकर, रियाज पठाण, वाहनचालक अरूण कांबळे यांनी सापळा रचून दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे ? कोणाची मदत घेतली ? हे मुन्नाच्या तपासातून पुढे येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले.
हेही वाचा - विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह