'मी जीवन संपवतोय...'; हवालदाराचा मेसेज अन् बीड पोलिसांची धावपळ
By सोमनाथ खताळ | Published: February 1, 2024 06:03 PM2024-02-01T18:03:04+5:302024-02-01T18:03:38+5:30
साधारण चार तास धावपळ झाल्यानंतर ते नातेवाईकांकडे असल्याचे समजले.
बीड : शहरातील पेठबीडपोलिस ठाण्याच्या एका पोलिस हवालदार यांनी मी आत्महत्या करतोय, असा मेसेज पोलिसांच्या ग्रुपवर टाकला अन् फोन बंद केला. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी पूर्ण पोलिस दलाची चार तास शोध माेहिम चालली. रात्री १ वाजेच्या सुमारास ते नातेवाईकाककडे असल्याचे समजले. त्यानंतर सर्वांनीच मोकळा श्वास घेतला. बुधवारी रात्री ८ ते पहाटे १ वाजेपर्यंत या प्रकरणात पोलिसांची धावपळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पेठबीड पाेलिस ठाण्यातील एका हवालदाराविरोधात तक्रारी वाढल्या हाेत्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कसुरी अहवालावरून त्यांना बुधवारी पाेलिस मुख्यालयाशी संलग्न केले होते. त्यानंतर संबंधित हवालदार यांनी पेठबीड पोलिस ठाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी आत्महत्या करतोय, असा मेसेज टाकला आणि फोन बंद केला. त्यानंतर पेठबीड पोलिसांसह ग्रामीण, शहर पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोहिम राबविली. नातेवाईकही त्यांना शोधत होते. साधारण चार तास धावपळ झाल्यानंतर ते नातेवाईकांकडे असल्याचे समजले. मग सर्वांनीच मोकळा श्वास घेतला.
सर्वत्र शोधाशोध केली
पेठबीड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने ग्रुपवर मेसेज टाकला होता. त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. नंतर ते नातेवाईकांकडे असल्याचे समजले. साधारण तीन ते चार तास त्यांचा शोध घेण्यात आला होता.
- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड