- समर्थ भांडबीड : राजकारणात कोणती लाट कधी निर्माण होईल याचा भरवसा नसतो. स्थानिक पातळीवरील लाटेची खात्री करूनच प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडत असतो. असेच चित्र १९९६ च्या बीड लोकसभा निवडणुकीत निर्माण झाले होते. जिल्ह्याच्या राजकारणात महिला कार्यकर्त्या सक्रिय असल्यामुळे महिला उमेदवाराच्या विरोधात पुरुष उमेदवार उभे न करता सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या. भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या तिन्ही राजकीय पक्षांनी महिला उमेदवार देत विक्रम रचला होता. त्यानंतर आजपर्यंत अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नाही.
कोण होत्या महिला उमेदवार, किती मते? रजनी पाटील, २७९९९५ केशरकाकू क्षीरसागर, २२२५३५ सुशीला मोराळे, ७३९००
कोण विजयी? १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख मुख्य राजकीय पक्षांनी महिला उमेदवार दिल्या. तसेच जवळपास सर्वच महिला उमेदवारांनी लाखाच्या आसपास मते मिळविली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रजनी अशोकराव पाटील यांचा ५७ हजार ४६० मतांनी विजयी झाल्या होत्या. दरम्यान, महिला उमेदवारांमध्ये निवडणूक झाल्याने ही निवडणूक सर्वांच्याच लक्षात राहिली आहे.
अपक्ष पुरुष उमेदवार..लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्य राजकीय पक्षांनी जरी महिला उमेदवार दिल्या असल्या तरी दोन अपक्ष पुरुषांनीही ही निवडणूक लढवली. सुधाकर पाटील व नारायण कोळपुसे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. दोन्ही उमेदवारांना १५ हजारांच्या आत मते मिळाली होती. तर १४ हजार १२४ मते अवैध ठरली होती.