महागाईने शेती करणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:15+5:302021-03-25T04:31:15+5:30
अंबाजोगाई : रासायनिक खते, इंधनाची दरवाढ यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांचे भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेती ...
अंबाजोगाई : रासायनिक खते, इंधनाची दरवाढ यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मजुरांचे भावही मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेती करणाऱ्या जमीनदाराला वाढत्या महागाईमुळे शेती करणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. उत्पादन खर्च निघणेही दुरापास्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सामान्य शेतकरी विविध कारणाने गेल्या दहा वर्षांपासून त्रस्त आहे. सतत वातावरणात होणारा बदल यामुळे शेतकऱ्यांसमोरही चिंता वाढली आहे. दरवर्षी वर्षातून दोनवेळा होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच सततच्या गारपिटीमुळे जमिनीचा कसही कमी होतो. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. दरवर्षी वातावरणाच्या बदलांमुळे कधी पाऊस तर कधी दुष्काळ ही स्थिती सातत्याने आहे. या निसर्गचक्रात शेतकरी सातत्याने पिसला जात आहे. अतिवृष्टीमुळे यावर्षी पिके पाण्यात बुडाली. तर रब्बी हंगामात गारपिटीने शेतकऱ्यांना ग्रासले. अशी स्थिती दरवर्षी निर्माण होते. त्यातच मजुरांचे वाढलेले भाव रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती. इंधनांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले भाव यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. इंधनाचा खर्च वाढत चालल्याने ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणारी मशागत दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना बैलबारदाना सांभाळणे परवडत नाही. परिणामी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करावी लागते. सर्वच बाबतीतील वाढती महागाई शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरली आहे. या वाढत्या महागाईमुळे शेती करणेही कठीण झाल्याने शेती करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.