धारुर पोलीस ठाण्यातून पळालेला अट्टल गुन्हेगार कोल्हापूरमध्ये जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:32 AM2018-08-29T00:32:57+5:302018-08-29T00:33:33+5:30
बीड : लुटारू टोळीचा म्होरक्या कुख्यात विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून ११ महिन्यांपूर्वी पळून गेला होता. त्याला कोल्हापूर पोलिसांनी पकडले आहे. बीड पोलिसांनी विलासचे लोकेशन आणि इतर माहिती पुरविल्याने कोल्हापूर पोलिसांना ही कारवाई करणे सोपे झाले. विलास हा बीडसह राज्यातील ११ जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. त्याला दोन दिवसांनी पुन्हा विविध गुन्ह्यांत बीडला आणले जाणार आहे.
विलास बडे, गणेश बडे या भावंडांसह बाळू पवार यांची टोळी आहे. या टोळीने बीड जिल्ह्यासह पुणे ग्रामीण, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला. एवढ्यावरच न थांबता या टोळीने कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्येही गुन्हे केले होते. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी पकडून त्याच्यावर ‘मोका’ची कारवाई केली. तो कारागृहात होता.
त्यानंतर बीड पोलिसांनी त्याला धारूरच्या गुन्ह्यात बीडला आणले. काही तास राहिल्यानंतर पोलिसांची नजर चुकवून त्याने ठाण्यातून पलायन केले होते. बीड पोलिसांसह राज्यातील पोलीस त्याचा शोध घेत होती. परंतु त्यावेळेस तो मिळाला नाही.
त्यानंतरही बीड पोलिसांकडून त्याची माहिती घेतली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात तो असल्याची माहिती मिळताच तेथील पोलिसांनी बीडमधून माहिती मागविली. त्याची ‘हिस्ट्री’ पाठविल्यानंतर तात्काळ त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला आता पुन्हा बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये बीडमध्ये आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुण्यानंतर बीडमध्ये मोका
विलासवर पुणे पोलिसांनी ‘मोका’ची कारवाई केलेली आहे. त्यातच तो पुणे कारागृहात होता. त्यानंतर त्याला बीडला आणले. येथेही बीड पोलिसांनी त्याच्यासह पूर्ण टोळीवर मोकाची कारवाई केली होती.