आरोग्य उपसंचालकांनी केले बीड जिल्हा रूग्णालयाचे ‘ऑपरेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 05:27 PM2019-06-03T17:27:23+5:302019-06-03T17:30:50+5:30
‘आजारी’ रूग्णालयाचे ‘आॅपरेशन’ केल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
बीड : लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी अचानक जिल्हा रूग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व रूग्णालयाचा आढावा घेण्याबरोबरच डॉक्टरांची हजेरी घेतली. दांडी बहाद्दरांवर तात्काळ कारवाई करून आरोग्य सेवा व स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश माले यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. उपसंचालकांनी अचानक येऊन ‘आजारी’ रूग्णालयाचे ‘आॅपरेशन’ केल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
जिल्हा रूग्णालयातआल्यावर बाह्य रूग्ण विभागात तात्काळ व तत्पर सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपसंचालक डॉ.माले यांनी सोमवारी अचानक सर्व बाह्यरूग्ण विभागाची तपासणी केली. नेहमीप्रमाणे अस्थि व बालरोग विभागातील डॉक्टर गैरहजर होते. रूग्णांच्या बाहेर लांबचलांब रांगा होत्या. त्यानंतर त्यांनी सर्वच विभागात जावून आढावा घेण्याबरोबरच रूग्ण व नातेवाईकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. आलेल्या तक्रारींचे तात्काळ निरसण करून तात्काळ व दर्जेदार सेवा देण्याचे आदेश डॉ.माले यांनी आरोग्य प्रशासनाला दिले. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, मेट्रन खैरमोडे यांची उपस्थिती होती.
अॅप्रन नसल्यास डॉक्टरांवर कारवाई
रूग्णालयात ड्यूटीवर येताना डॉक्टरांसह सर्वच कर्मचाºयांना ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आलेला आहे. जे ड्रेसकोड घालणार नाहीत, त्यांना कर्तव्यावर हजर होऊच देऊ नका, असे आदेशही डॉ.माले यांनी दिले. डॉक्टारांनी अॅप्रनसह गळ्यात स्टेटस्कोप ठेवणे बंधनकारक आहे, असेही ते म्हणाले.
नातेवाईकांसाठी क्लिनीक
रूग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी आता जिल्हा रूग्णालयात नातेवाईक क्लिनीक सुरू करण्यात येणार आहे. येथे एका डॉक्टरसह परिचारीका, समुपदेशकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. रूग्णालय सरकारी नसून ‘आपलं’ आहे, असे समजून सांगण्यात येणार आहे.
स्वच्छतागृहांसाठी सा.बां.ला पत्र द्या
रूग्णालयातील एकही शौचालय व स्वच्छतागृह व्यवस्थित नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. तर काही शौचालये बंद आहेत. हाच धागा पकडून डॉ.माले यांनी या सर्वांचा आढावा घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्याचे आदेश दिले. तात्काळ दुरूस्ती करून ते वापरण्योग्य करण्यास सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आदेश दिले.
कोपरे लाल केल्यास श्रमदानाची शिक्षा
रूग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक धुम्रपान करतात. त्यामुळे ते कोठे पण थुंकतात. याचा परिणाम आरोग्यावर व स्वच्छतेवर होता. त्यामुळे आता सुरक्षा रक्षकामार्फत तपासणी करून हे सर्व बाहेरच काढून घ्या. तसेच दंड घ्या. दंड न भरल्यास दिवसभर श्रमदान करून घ्या, अशा सुचनाही डॉ.माले यांनी दिल्या आहेत.
आरोग्य वर्धिनी अभियान
आरोग्य विभागाकडून वर्धिनी अभियान राबविले जात आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शहरांमधील पालिकेच्या दवाखान्यांमध्ये यासाठी मंजूरी मिळाली आहे. विविध १३ प्रकारच्या आरोग्य सेवा या अभियानातून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात जनजागृतीही केली जाणार आहे.
जिल्हा रूग्णालयाती सुविधा, स्वच्छता, सेवा आदी विषयांवर पाहणी करून आढावा घेतला आहे. सुचना करून आदेश दिले आहेत. आठवड्यात याची अंमलबजाावणी केली जाईल. गैरहजर डॉक्टरांवर कारवाई केली जाईल. तक्रारी येणार नाहीत आणि आल्या तर तात्काळ कारवाई केली जाईल.
डॉ.एकनाथ माले, उपसंचालक, आरोग्य विभाग लातूर