आष्टी तालुक्यात अवैध वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:12 AM2019-03-27T00:12:27+5:302019-03-27T00:13:44+5:30
एकीकडे वृक्षलागवड करून ती जगविण्यासाठी धडपड करणारे नागरिक, तर दुसरीकडे लाकूड तस्करांकडून स्वयंचलित मशीनद्वारे ट्रक व ट्रॅक्टरद्वारे होणारी वृक्षतोड असे परस्परविरोधी चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
कडा: एकीकडे वृक्षलागवड करून ती जगविण्यासाठी धडपड करणारे नागरिक, तर दुसरीकडे लाकूड तस्करांकडून स्वयंचलित मशीनद्वारे ट्रक व ट्रॅक्टरद्वारे होणारी वृक्षतोड असे परस्परविरोधी चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. अवैधरीत्या तोडण्यात आलेल्या झाडांची कत्तल करून त्याच्या फळ्या व चौकोनी तुकडे करून आरा गिरण्यांमार्फत मुंबई, पुणे यासारख्या शहरांत पाठवून मोठ्या प्रमाणावर पैसे कमविण्याचा उद्योग सुरू आहे.
आष्टी पोलिसांनी सोमवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार आयटीआय महाविद्यालयाजवळ शिंदेवाडी फाट्यानजीक वेताळवाडी, किन्ही भागांत लिंबाच्या मोठमोठ्या लिंबाच्या झाडांची कत्तल करून लाकडांनी गच्च भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच-२३, क्यू-१५९४) आरा गिरणीकडे जात असताना पकडला. पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ गायकवाड, अजित सिकेतोड, सचिन कोळेकर या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे वनविभागाचे व लाकूड तस्करांशी असलेले कनेक्शन उघड झाले आहे.
दत्ता काकडे यांचा इशारा : तक्रार करणार
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असून, येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सॉ मिल धारक आणि लाकडांच्या व्यापाऱ्यांशी संबंध असून, जर कुणी अवैध लाकूडतोडीची माहिती वनविभागाला देऊनही कारवाई होत नाही. याउलट सॉ मिलधारकांना याबद्दल माहिती देऊन ही लाकडे परस्पर दुसरीकडे घेऊन जाण्याबाबत सांगण्यात येते.
२५ मार्च रोजी सायंकाळी साडेआठ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांना माहिती देऊनही लाकूड भरून आलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यापेक्षा काकडे यांनी त्यांचा फोन बंद करून ठेवला. यानंतर आष्टी पोलिसांनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून त्यावर आता कारवाई सुरू आहे.
निष्क्रि य वनपरिक्षेत्र अधिकारी काकडे यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त व वन विभागाच्या सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे जलनायक दत्ता काकडे यांनी सांगितले.