धारूर : धारूर तेलगाव या राष्ट्रीय मार्गावर आरणवाडी साठवण तलावाजवळ रस्ता उंची वाढवणे व रुंदीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिवसेनेने बंद पाडले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांना भेटून या कामाची चौकशी करून तत्काळ चांगल्या दर्जाचे काम करावे, अशी मागणी केली. त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
धारूर-तेलगाव या राष्ट्रीय महामार्गावर आरणवाडी साठवण तलावाजवळ पाण्यामध्ये रस्ता जाऊ नये म्हणून पाचशे मीटर रस्त्याचे रुंदीकरण व उंची वाढवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. अरूंद व कमी उंचीचे होत असल्यामुळे अनेक तक्रारी होत्या. राज्य रस्ते विकास महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होते. यामुळे हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी हे काम बंद पाडले. हे काम चांगल्या दर्जाचे व नियमानुसार अंदाजपत्रकानुसार व्हावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, तालुका प्रमुख बाळासाहेब कुरूंद, संघटक राजकुमार शेटे यांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेऊन या रस्त्याच्या कामातील दोष निदर्शनास आणूण दिले. तत्काळ या कामात दुरूस्तीची व नियमानुसार करण्याचे मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी जगताप यांनी तत्काळ कारवाई करू व संबंधित अधिकाऱ्यास काम चांगल्या दर्जाचे व नियमानुसार करण्याच्या सूचना देऊ, असे आश्वासन दिले. काम चांगल्या दर्जाचे व नियमानुसार करून घेतले जाईल, असे सांगितले. यामुळे शिवसेनेच्या मागणीला यश आले.