बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या सध्या अंबेजोगाई तालुक्यात सर्वाधिक आहे. याशिवाय अंबेजोगाई शहरात असणाऱ्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केलेल्या डीसीसीएच सेंटरमध्ये कोविड रुग्णांवर अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार मिळत असल्याची सत्यता सर्वदूर पसरली असल्यामुळे या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्णांमध्ये अत्यवस्थ स्थितीत येणाऱ्या रुग्णांची संख्या ही मोठी असल्यामुळे मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे.
त्यामुळे शहरात शवदाहिनी बसविण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
कोविड मयतांवर अंत्यसंस्कार करण्याची संपूर्ण जबाबदारी अंबेजोगाई नगरपरिषद कार्यालयावर आहे. या मयत रुग्णांमध्ये अंबेजोगाई शहराबाहेरील मयत रुग्णांची संख्या अधिक असली, तरी नगरपरिषदेच्या वतीने सर्व नियम पाळून कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, मयतांची संख्या सातत्याने वाढत चालल्यामुळे त्याचा ताण नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर पडतोच आहे.
पालमंत्र्यांनी दिले होते आदेश
२०२० साली कोविडच्या पहिल्या फेजमध्ये कोविड रुग्णांच्या मृत्यूचा वाढता दर लक्षात घेता व अंत्यसंस्कारासाठीच्या जागेचा वाद उफाळून आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा विकास निधीतून अंबेजोगाई व बीड शहरासाठी प्रत्येकी एक शवदाहिनी बसवण्यात येईल, असे स्पष्ट करून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना या संबंधीचे आदेशही त्यांनी दिले होते. मात्र, जिल्हाधिकारी पदावरून रेखावार यांची बदली झाल्यानंतर ही मागणी बाजूला पडली.
शवदाहिनी बनली काळाची गरज
अंबेजोगाई येथे उपचारासाठी येणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या सतत वाढतच चालली आहे. त्यात अत्यवस्थ स्थितीत येणारे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. शिवाय स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. उपचार करताना दगावलेल्या अनेक रुग्णांवर वैद्यकीय प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे अंबेजोगाई शहरात शवदाहिनी असणे ही काळाची गरज बनली आहे. पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा याबाबतचे आदेश नव्याने काढण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न.प. केला होता पाठपुरावा
गतवर्षी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा विकास योजना निधीतून अंबेजोगाई शहरात शवदाहिनी बसविण्याची घोषणा करुन तशा सूचना तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांना केल्या होत्या. यानंतर, नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावाही केला होता. मात्र, जिल्हाधिकारी रेखावार यांच्या बदलीनंतर शवदाहिनी बसविण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.
- नगराध्यक्ष, राजकिशोर मोदी